संताप : घोटीतील पर्यायी रस्त्यासह शाळा दोन दिवसांपासून बंद
By Admin | Updated: June 25, 2015 00:43 IST2015-06-25T00:42:50+5:302015-06-25T00:43:23+5:30
चौदा गावांंची गैरसोय

संताप : घोटीतील पर्यायी रस्त्यासह शाळा दोन दिवसांपासून बंद
घोटी : काळुस्ते रस्त्यावरील घोटीजवळील दारणा नदीपात्रातील पर्यायी रस्ता रविवारी मध्यरात्री पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चौदा गावांचा घोटी शहराची संपर्क तुटला असून, त्यानंतर प्रशासनाच्या वतीने या गावांना शेनवड बु।।, खैरगावमार्गे घोटीला येण्यासाठी असलेल्या पर्यायी रस्त्याचा दावाही मुसळधार पावसाने फोल ठरविला आहे. केवळ दुचाकी अथवा पायी चालण्यासाठी असलेल्या या रस्त्यावर बुधवारी सकाळी खैरगावनजीक एक वृक्ष कोसळल्याने तसेच शेणवड बु।।जवळ असलेला एक छोटा पूल पाण्याखाली गेल्याने हा एकमेव मार्गही बुधवारपासून पाण्याखाली गेल्याने बंद झाला आहे. परिसरातील नागरिक अडकून पडले आहेत.
या भागातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा सुमारे बारा शाळांमध्ये शिक्षक पोहोचत नसल्याने शाळाही गेली दोन दिवसांपासून बंद आहेत. या भागातील जनतेने प्रशासनावर विश्वास ठेवून या रस्त्यावरून पायी अथवा दुचाकीने घोटी शहराशी दळणवळण चालू केले होते. मात्र विक्रमी पावसाने शेणवड बु।। नजीकचा लघुपाटबंधारा ओसंडून वाहू लागल्याने या बंधाऱ्याच्या पाण्यात या रस्त्यावरील एक छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूकही आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणापासून जवळच एक बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या चौदा गावांचा घोटी शहराशी आज पूर्णपणे संपर्क तुटल्याने या भागातील आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणामी झाला आहे. या भागात गेली दोन दिवसांपासून शिक्षक पोहचत नसल्याने या भागातील तब्बल बारा प्राथमिक शाळा आणि काही माध्यमिक शाळा गेल्या सोमवारपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर या भागातील आरोग्य यंत्रणेवरही परिणाम झाला असून, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या भागात पोहचत नसल्याने अत्यावश्यक रु ग्णावर कुठे आणि कसे उपचार करावेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, शहराशी संपर्क तुटल्याने या भागातील हजारो नागरिक अडकले असताना प्रशासनाच्या वतीने मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.