‘रिपाइं’च्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: October 10, 2016 01:51 IST2016-10-10T01:50:24+5:302016-10-10T01:51:21+5:30
कठोर शिक्षा द्या : जातीयवादी रंग दिला जात असल्याचा आरोप

‘रिपाइं’च्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन
नाशिक : तळेगावमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ‘या घटनेमधील संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, मात्र घटनेचे भांडवल करून त्यास जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असल्याचे गाऱ्हाणे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले.
जिल्ह्यात तळेगावच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको करून आंदोलकांनी निषेध केला; मात्र यावेळी काही समाजकंटकांनी परिवहन महामंडळांच्या बसेसपासून पोलीस वाहने आणि निरपराध नागरिकांनाही लक्ष्य केले. गावपातळीवरील पूर्ववैमनस्यांमधून विनाकारण काही नागरिकांच्या घरांना व वाहनांना समाजकंटक लक्ष्य करीत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने महाजन यांच्याशी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस बळ अपुरे पडत असून, जे पोलीस आहे ते बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र एकाही समाजकंटकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. त्याची फलनिष्पत्ती तणावामध्ये झाली. पोलिसांनी वेळीच समाजकंटकांना आवरले असते तर कदाचित जिल्ह्यात रान पेटले नसते, असाही आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस संरक्षण द्यावे, समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक सत्र राबवावे, कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नये, अशा मागण्या निवदेनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
‘रिपाइं’चे कार्यकर्ते सीबीएस येथील उद्यानासमोर एकत्र आले. तेथून घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने मोर्चा काढला. मोर्चा त्र्यंबकनाका, गडकरी चौकातून रात्री आठ वाजेच्या सुमारास विश्रामगृहावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आठ ते दहा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला व निवेदन दिले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)