ग्रामसेवक युनियनचे आयुक्तांना निवेदन
By Admin | Updated: November 16, 2016 02:00 IST2016-11-16T02:04:19+5:302016-11-16T02:00:42+5:30
ग्रामसेवक युनियनचे आयुक्तांना निवेदन

ग्रामसेवक युनियनचे आयुक्तांना निवेदन
नाशिकरोड : ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक युनियनच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्ष सेवाकाल नियमित करण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवरील चुकीची कार्यवाही रद्द करण्यात येऊन पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांकडील चुकीची कार्यवाही रद्द करण्यात यावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना दरमहा प्रवास भत्ता पगाराबरोबर तीन हजार देण्यात यावा, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता बदलण्यात यावी, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मिती करण्यात यावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, विभागीय महिला संघटक दिपाली उगलमुगले, संजय पाटील, तारकेश्वर सोनवणे, बापूसाहेब आहिरे, अशोक नरसाळे, रवींद्र शेलार, संजय भारंबे, संजीव निकम, पी.ज. सोनवणे, प्रवीण मोरे, आर.आर. शेंडे, पी.टी. भामरे आदिंसह राज्यभरातील ग्रामसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)