भाजपा आमदारत्रयींनी राखली प्रतिष्ठा
By Admin | Updated: February 24, 2017 01:35 IST2017-02-24T01:35:32+5:302017-02-24T01:35:51+5:30
पश्चिम विभाग : भाजपा ५, शिवसेना ४, आघाडी ३ जागांवर विजयी

भाजपा आमदारत्रयींनी राखली प्रतिष्ठा
नाशिक : पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील रहिवासी तिन्ही आमदारांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळविले आहे. भाजपाने या प्रभागातून तीन जागांवर विजय मिळवत विभागात सर्वाधिक पाच जागा पटकावल्या. शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी या प्रभागात भगवा फडकावला. मात्र त्यांच्यासोबतच्या अन्य तीन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग १२ मध्ये भाजपाला दोन जागांवर व काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळविता आला. प्रभाग २४ मध्ये शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी विजयी पताका फडकावली. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली. या प्रभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रवीण तिदमे यांनी नऊ हजाराहून अधिक मताधिक्याने मिळवलेला विजय लक्षवेधी ठरला. १२ ड मधून शिवाजी गांगुर्डे यांनी शैलेश कुटे यांचा १,९०२ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ७ मध्ये आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, राहुल अहेर यांची चुलत बहीण हिमगौैरी आडके व आमदार देवयानी फरांदे यांच्या समर्थक स्वाती भामरे यांनी विजय मिळवल्याने भाजपाच्या आमदारत्रयींना प्रतिष्ठा राखता आली. तर अजय बोरस्त यांनी भाजपाच्या नरेंद्र पवार यांचा ४,१२८ मतांनी पराभव करीत एकमेव जागेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. मात्र, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे व जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे यांच्या पत्नी सुनीता गुळवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग १२ मध्ये भाजपाच्या प्रियंका घाटे यांनी सुरुवातीपासून आघाडी राखत विजय मिळवला असला तरी नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात चुरशीची लढत पहायला मिळाली.
सुरुवातीला आघाडीवर असलेल्या अपक्ष सुरेश पाटील यांना काँग्रेसच्या समीर कांबळे यांनी चौथ्या फेरीत मागे टाकले. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत कांबळे यांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी भाजपाच्या प्रेरणा बेळे यांना चौथ्या फेरीत १९४ मतांनी मागे टाकले. मतांचे हे अंतर शेवटच्या फेऱ्यांमध्ये आणखीच वाढत गेल्यामुळे हेमलता पाटील अवघ्या ५५९ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग २४ मध्ये सर्वसाधारण खुल्या गटातून प्रवीण तिदमे यांनी ९४२४ मताधिक्याने निर्विवाद विजय मिळवला. तिदमे यांनी सुरुवातीपासूनच विजयी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर सर्वसाधारण महिला गटातून कल्पना चुंभळे यांनी ५०८० मताधिक्याने विजय मिळवला.
परंतु नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून त्यांच्याच कुटुंबातील कैलास चुंभळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले यांनी २३९५ मताधिक्याने पराभूत केले. नागरिकांचा मागास प्रवर्ग या महिलांसाठी राखीव जागेवर शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी भाजपाच्या सुनंदा गिते यांचा २८८६ मतांनी पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. याठीकाणी विद्यमान नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांची थेट तिसऱ्या स्थानावर पीछेहाट झाली आहे. (प्रतिनिधी)