रुग्ण कळवा;अन्यथा कारवाई
By Admin | Updated: November 17, 2014 01:10 IST2014-11-17T01:09:45+5:302014-11-17T01:10:20+5:30
रुग्ण कळवा;अन्यथा कारवाई

रुग्ण कळवा;अन्यथा कारवाई
नाशिक : शहरात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात होत असून, अनेक संशयित रुग्ण दगावले जात आहेत. परंतु पालिका प्रशासन मात्र त्याबाबत अंधारात असते. त्यामुळे टीका सहन कराव्या लागणाऱ्या पालिका प्रशासनाने सतर्क होऊन वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली आहे. साथ रोगाची माहिती न दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच पालिकेने भरला आहे.
शहरात सध्या डेंग्यूची साथ असून अडीचशेहून अधिक रुग्ण आहेत. काही संशयित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते मात्र अनभिज्ञ असतात. कित्येकदा तर रुग्णांच्या मृत्यूची माहिती वृत्तपत्रातूनच वैद्यकीय विभागाला कळते आणि संंबंधित रुग्णांचे रक्तनमुने घेणे किंवा तपासणी करणेही नंतर शक्य होत नाही. वास्तविक, अनुसूचित यादीत समाविष्ट असलेल्या क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, कावीळ, स्वाइन फ्लू, विषमज्वर, गॅस्ट्रो पोलिओ, गोवर यापैकी आजार आढळल्यास रुग्णाची संपूर्ण माहिती, लागण, दिनांक अशी सर्व विहित नमुन्यातील माहिती आपल्या परिसरातील शहरी आरोग्य सेवा केंद्राला तातडीने कळवावी म्हणजे त्याठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. संसर्गजन्य रुग्णांची माहिती न कळविल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय अधीक्षकांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कळविले आहे. (प्रतिनिधी)