पंचवटीत पुन्हा उशिराने घंटागाड्या
By Admin | Updated: October 2, 2015 23:33 IST2015-10-02T23:31:33+5:302015-10-02T23:33:04+5:30
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : जागोजागी कचरा पडूनच

पंचवटीत पुन्हा उशिराने घंटागाड्या
पंचवटी : महापालिका प्रशासनाने केरकचरा उचलण्यासाठी पंचवटी परिसरात घंटागाड्या सुरू केल्या असल्या तरी प्रत्यक्षात घंटागाड्या वेळेत पोहचत नसल्याने रस्त्यालगत केरकचरा पडून राहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पंचवटीतील काही परिसरांत उशिराने घंटागाड्या येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पंचवटीत उशिराने घंटागाड्या येत असल्या तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच घंटागाडी ठेकेदार बदलल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी सकाळी साडेसात ते आठ वाजता परिसरात दिसणाऱ्या घंटागाड्या आता कधी कधी दहा, तर कधी अकरा वाजेला ठरवून दिलेल्या भागात फिरत असल्याचे दिसून येते. घंटागाडी वेळेत येत नसल्याने नागरिक थेट रस्त्यालगतच कचरा फेकतात.
उघड्यावर कचरा फेकला जात असल्याने परिसराला अवकळा तर येतेच शिवाय रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घंटागाडीमार्फत केरकचरा उचलला जात असला तरी प्रत्यक्षात घंटागाडी उशिराने दाखल होत असल्यामुळे तोपर्यंत कचरा पडूनच राहत असल्याचे चित्र सध्या पंचवटी परिसरात दिसून येत आहे. (वार्ताहर)