चौरंगी लढतीत पुनरावृत्ती की परिवर्तन

By Admin | Updated: October 11, 2014 23:27 IST2014-10-11T23:27:10+5:302014-10-11T23:27:10+5:30

चौरंगी लढतीत पुनरावृत्ती की परिवर्तन

Repeat changes in a fourfold match | चौरंगी लढतीत पुनरावृत्ती की परिवर्तन

चौरंगी लढतीत पुनरावृत्ती की परिवर्तन

राज्याचे लक्ष वेधू शकणारी लढत म्हणून चांदवड विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. सलग दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्यास शिरीषकुमार कोतवाल जसे इच्छुक आहेत, तसेच त्यांचा पाडाव करण्यासाठी माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल अहेर यांनीही कार्यकर्त्यांच्या बळावर कंबर कसली आहे. चांदवडच्या पाच गटांतील पाच, तर देवळा तालुक्यातून एकच उमेदवार असल्याने साहजिकच त्याचा फायदा डॉ. राहुल अहेर यांना होण्याची चिन्हे असली तरी नाते-गोते आणि कट्टर कार्यकर्ते या बळावर शिरीषकुमार कोतवाल व अपक्ष म्हणून रिंगणात उतरून निवडणुकीत रंग भरणारे डॉ. आत्माराम कुंभार्डेही प्रसंगी सरस ठरू शकतात. उमेदवारीच्या आदल्या दिवसापर्यंत ना-ना करणारे उत्तम बाबा भालेराव ऐनवेळी विधानसभेच्या चालत्या बसमध्ये चढल्याने त्यांना विधानसभेच्या पायऱ्या चढता येतात काय, हे पाहणेही तितकेच मनोरंजक ठरणार आहे.
राहुल गांधी या कॉँग्रेसच्या स्टार प्रचारकाची वणीला सभा झाल्याने त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वाधिक फायदा हा दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव व चांदवडच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे चांदवड विधानसभा निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे.
देवळ्यातून एकच प्रबळ उमेदवार असल्याने त्याचा फायदा भाजपाला व पर्यायाने डॉ. राहुल अहेर यांना होऊ शकतो. मात्र आमदार म्हणून देवळा तालुक्यात काही सिंचनाची केलेली कामे शिरीषकुमार कोतवाल यांना नाही तरी थोडा फार ‘हात’ देण्याची शक्यता आहे. चांदवड तालुक्यातील पाच गटांतून पाच उमेदवार लढत आहेत. या मतविभागणीचा फायदा कोणाला होतो, त्यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे. आजमितीस तरी शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवडच्या सर्वच पाचही गटांतून अन्य उमेदवारांपेक्षा आघाडी मिळेल यासाठी गावोगावी प्रचार फेऱ्या काढून पायपीट सुरू केली आहे, तर डॉ. राहुल अहेर यांनीही अहेर कुटुंबीयांच्या देवळ्यासाठी आजवरच्या योगदानावर भर देत नवीन असलो तरी केंद्रात जे सरकार आहे, त्याचा थेट फायदा राज्याला होण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचे सांगत देवळ्याबरोबरच चांदवडमध्येही मते मागण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार उत्तम भालेराव हे पाच वर्षे प्रवाहात नसल्याने आणि मनसेचे डॉ. नवलकिशोर शिंदे हे नवखेच असल्याने तर शिवसेनेचे नितीन अहेर हे चांदवड व देवळ्यात फारसे सेनेचा फारसा प्रभाव नसल्याने कितपत प्रभावी ठरू शकतात, याबाबत बोलणे धाडसी ठरेल. चांदवड व देवळ्यात प्रामुख्याने पाणी आणि वीज या मुद्द्यांभोवतीच निवडणूक फिरत असल्याने देवळ्यात सिंचनाचा, तर चांदवडमध्ये वीज व रस्त्याचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरेल. खरी लढत ही कॉँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल, भाजपाचे डॉ. राहुल अहेर, अपक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे व राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार उत्तम भालेराव यांच्यात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Web Title: Repeat changes in a fourfold match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.