कालव्यांच्या सर्वेक्षणासह दुरुस्ती करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:28 IST2020-01-16T00:21:41+5:302020-01-16T00:28:11+5:30
जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

मुंबई येथे मंत्रालयात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीप्रसंगी आमदार नितीन पवार दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, अलका अहिरराव आदी.
कळवण : जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
नाशिक जिल्हा रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी अर्जुनसागर (पुनंद) व चणकापूर प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान एक व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान तीन आवर्तने आरक्षित करावीत व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करून तात्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली. यावेळी छगन भुजबळ यांना कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रश्नासंदर्भातील निर्माण झालेल्या अडचणी व विविध मागण्यांचे निवेदन आमदार पवार यांनी दिले. चणकापूर प्रकल्प, गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात एक आवर्तनाचे नियोजन आहे. तसेच सिंचन व बिगरसिंचन आवर्तन एकत्रितपणे नियोजन करून होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात आवर्तन देण्याचे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगरसिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरूपयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.