जमीन अधिग्रहणासाठी १०.५६ लाख भाडे
By Admin | Updated: January 10, 2015 00:32 IST2015-01-10T00:32:13+5:302015-01-10T00:32:43+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : सहमती न दिल्यास अधिग्रहण कायम

जमीन अधिग्रहणासाठी १०.५६ लाख भाडे
नाशिक : तपोवनातील जागामालक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहणासाठी दहा लाख ५६ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले असून, या दरातच शेतकऱ्याच्या शेतीपिकांचा मोबदला व जमीन पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी सहमतीने जमिनी दिल्यास त्यांचे स्वागतच अन्यथा साधुग्रामसाठी प्रशासनाची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत तपोवनातील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याच्या आधारे जमीन अधिग्रहणास संमती दिल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु तो मोबदला किती असेल हे पालकमंत्र्यांनी जाहीर केले नाही. शुक्रवारी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शेतकऱ्यांच्या एक वर्षे जमीन अधिग्रहणाचे भाडे, त्यातून पिकाचे होणारे नुकसान व कुंभमेळा आटोपल्यानंतर जमीन पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च, असे सर्व मिळून एकरी दहा लाख, ५६ हजार रुपये भाडे देण्यात येणार असल्याचे सांगितले. साधुग्रामसाठी शेतकऱ्यांनी जागा देण्यास पूर्वी नकार दिला होता, आता मात्र त्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यांचे कमीत कमी नुकसान व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न असून, पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे हा दर निश्चित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. तपोवनात अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या सर्वच जागांसाठी हाच दर राहणार असून, त्यात कमी-जास्त होणार नाही. त्यामुळे शेतकरी सहमती दर्शवतील व जे शेतकरी दर्शविणार नाहीत, त्यांच्यासाठी जमीन अधिग्रहणाची सुरू करण्यात आलेली प्रक्रिया कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)