नवमतदार नोंदणी मोहीम
By Admin | Updated: March 1, 2017 00:47 IST2017-03-01T00:47:10+5:302017-03-01T00:47:22+5:30
नाशिक : मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे, या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे.

नवमतदार नोंदणी मोहीम
नाशिक : मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे, या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मतदार नोंदणी सप्ताह राबविण्यात येत असून, या कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी केलेल्या महिलांना त्यांच्या नावातील बदल, पत्त्यातील बदल आदि दुरुस्त्या करता येणार असून, नवीन मतदार नावनोंदणीही करता येणार आहे. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने आगामी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे. निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ६ ते ११ मार्च या कालावधीत महिला मतदारांच्या नावातील दुरुस्ती व अद्ययावतीकरणासह नवीन मतदारांची नोंदणीही करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली बीएलओना नमुना क्रमांक ६, ७ व ८ अ चे अर्ज वाटप करण्यात येणार असून ८ मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात महिला मतदारांची संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)