कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण

By Admin | Updated: November 12, 2014 01:53 IST2014-11-12T01:53:13+5:302014-11-12T01:53:49+5:30

मलमपट्टीवरच सारे भागणार

Renewal of Kalidas Kalamandira | कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण

कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण

नाशिक : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याची काही महिन्यांपूर्वी केलेली घोषणा बाजूला पडली असून, आता मलमपट्टीवरच सारे भागणार आहे. सुमारे तीस लाख रुपयांची वेगवेगळी कामे असून, त्यातील बहुतांशी कामे सुरूच झालेली नाहीत. सध्या कलावंतांच्या मागणीनुसार तळघरात रंगकाम सुरू करण्यात आले असले तरी लाइट बार, साऊंड बारसह सर्वच कामे प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकली आहेत.महाकवी कालिदास कलामंदिर ही शहरातील सर्वात महत्त्वाची सांस्कृतिक वास्तू असून, कलावंतांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. तथापि, कालिदासकडे प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने तुटफूट, कधी एसी बंद, खुर्च्या तुटलेल्या असे अनेक प्रकार घडत असतात. मध्यंतरी कलावंतांनी भोजनासाठी जागा मागताना अन्य अनेक सुधारणांच्या मागण्या केल्या होत्या. त्यावेळी महापालिकेने कालिदास कलामंदिराचे लवकरच नूतनीकरण करू असे जाहीर केले होते; परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. पालिकेने नूतनीकरणाची ठोस कामे करण्यापेक्षा तुकड्या तुकड्याने कामांची विभागणी करून कालिदासची मलमपट्टी सुरू केली आहे. तळघरात कलावंतांना भोजनासाठी जागा हवी होती, ती देण्यासाठी रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील भंगार मात्र अद्याप हटविण्यात आलेले नाही. त्यासाठी महापालिकेने कोटेशन मागविले असून, ते अद्याप निविदाप्रक्रियेत आहे. खुर्र्च्यांची दुरुस्ती, मेकअप रूमची दुरुस्ती ही सर्व कामे प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत अडकली आहेत.
कालिदासचे स्टेज जुने झाले असून, त्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. तथापि, तूर्तास लाइट आणि साऊंड बार हा स्वयंचलित पद्धतीने वर-खाली करता यावा हे तांत्रिक काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. सदरच्या कामाला काहीसा विलंब लागणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Renewal of Kalidas Kalamandira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.