रेशन, घासलेटसाठी ग्रामस्थांची दूरवर पायपीट
By Admin | Updated: April 30, 2017 00:30 IST2017-04-30T00:30:12+5:302017-04-30T00:30:30+5:30
ममदापूर : ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानाचे रेशन आणण्यासाठी राजापूरला, तर घासलेट आणण्यासाठी न्याहारखेडे येथे जावे लागते.

रेशन, घासलेटसाठी ग्रामस्थांची दूरवर पायपीट
ममदापूर : ममदापूरच्या ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानाचे रेशन आणण्यासाठी तीन किलोमीटर राजापूरला, तर घासलेट आणण्यासाठी आठ किमी अंतरावर न्याहारखेडे येथे जावे लागते. ममदापूर येथील शिधापत्रिकाधारकांना रेशन व रॉकेलचे वाटप ममदापूर गावातच करण्यात यावे, अशी मागणी ममदापूर ग्रामस्थांनी केली आहे.
ममदापूर येथे मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिकाधारक आहेत. गेल्या तीन वर्षापासून येथील शिधापत्रिकाधारकांना पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजापूर येथे जाऊन रॉकेल घ्यावे लागते. रॉकेल गेल्या तीन वर्षांपासून राजापूर येथील रॉकेल विक्रेता हा ममदापूर येथील नागरिकांना रॉकेल वाटप करण्याचे काम करत आहे.
या दोन गावात दोन प्रकारचे वाटप वेळेवर होत नसल्याने अनेक तक्रारी आहेत. तसेच काही वेळा दुकान तालुक्याच्या ठिकाणी तर कधी कधी खासगी कामासाठी बाहेरगावी गेल्यामुळे रेशन भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शारीरिक व मानसिक त्रास होतो. यामुळे वेळोवेळी अर्ज करून, मागणी करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल संबंधित विभागाचे अधिकारी घेत नाही त्यामुळे ममदापूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पुढील महिन्यात रॉकेल व रेशन दोन्हीचे
वाटप ममदापूर गावात झाले पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ममदापूर ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)