चरख्यातून गांधीजींचे केले स्मरण
By Admin | Updated: October 2, 2015 23:51 IST2015-10-02T23:50:50+5:302015-10-02T23:51:58+5:30
प्रेरणा : सूतकताई, पुस्तक प्रकाशनातून आदरांजली

चरख्यातून गांधीजींचे केले स्मरण
नाशिक : चरखागीत सुरू होते अन् शिस्तीत ओळीने मांडलेले अंबर चरखे फिरू लागतात... ‘वस्त्र नव्हे विचार’ असलेल्या खादीच्या निर्मितीसाठी साऱ्यांचे हात सारख्याच गतीने कताई करू लागतात... गांधीजींनी सांगितलेल्या कर्मयोगाच्या या जागराला बासरीच्या स्वरांची साथ लाभते अन् अवघे वातावरण बापूमय होऊन जाते...
गांधी जयंतीनिमित्त सर्वोदयी परिवाराच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तक प्रकाशन, सामूहिक सूतकताई व व्याख्यानातून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ कार्यकर्त्या वासंती सोर लिखित ‘गांधीजी आणि हरिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर होते. प्रा. डॉ. वाघ म्हणाले, महात्मा गांधींविषयी पसरवण्यात आलेल्या अनेक गैरसमजांचा प्रभाव दीर्घ परिणाम करणाऱ्या औषधी गोळ्यांप्रमाणे समाजात टिकून आहे. हे गैरसमज योगायोगाने नव्हे, तर निश्चित उद्देशातून पसरवण्यात आले आहेत. गांधीजी व आंबेडकर या दोघांविषयी हेच घडले. या दोघांच्या दृष्टिकोनात फरक होता; मात्र त्यांच्या काही विचारांत समानताही होती. त्यामुळे दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे. गांधीजी दलितविरोधी नव्हते. त्यांनी त्यांच्याकडे अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून पाहिले; मात्र तरी समाजात गैरसमज पसरले. ‘पुणे करार’ या महत्त्वाच्या घटनेविषयीही लोकांमध्ये अनभिज्ञता आहे. राखीव व विभक्त मतदारसंघ या संकल्पना काय होत्या, हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे सखोल अभ्यास गरजेचा आहे. लेखिका सोर यांनी श्रोते हेच आपल्या लिखाणाची प्रेरणा असल्याचे सांगितले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून गैरसमज पुढे येत गेले आणि ते दूर करण्यासाठी पुस्तके लिहिल्याचे त्या म्हणाल्या. तुषार सोर यांनी प्रास्ताविक केले. आस्था मांदळे यांनी ‘राज्य मॉँगू नही, स्वर्ग मॉँगू नहीं’ हे गीत सादर केले. तेजस्विनी सोर यांनी परिचय करून दिला.
दुसऱ्या टप्प्यात कताई मंडळाच्या सुमारे चाळीस सदस्यांनी अंबर चरख्यावर सामूहिक सूतकताई केली. ‘गुणगुण गुंजन चरखा करी’ या चरखागीताने कताईला प्रारंभ झाला. वासंती सोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद दीक्षित, श्रीकांत नावरेकर, गौतम भटेवरा, प्रदीप धुळेकर, स्नेहा सूर्यवंशी आदिंनी कताईत सहभाग घेतला. यावेळी बासरीवादक अनिल कुटे, समृद्ध कुटे यांनी सुमधुर बासरीवादन केले. कार्यक्रमाला राम गायटे, यशवंत बर्वे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)