याद करो कुर्बानी...
By Admin | Updated: August 26, 2016 22:28 IST2016-08-26T22:28:44+5:302016-08-26T22:28:57+5:30
वडांगळी विद्यालय : चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

याद करो कुर्बानी...
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विद्या संकुलात ‘याद करो कुर्बानी’ सप्ताहांतर्गत देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ७० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ आॅगस्ट ते २३ आॅगस्ट हा कालावधी ‘याद करो कुर्बानी’ सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिलीच्या प्रथम वर्गातील चिमुकल्यांनी ‘नन्हा मुन्ना राही हूॅँ, देसका सिपाई हूॅँ। बोलो मेरे संग जय हिन्द जय हिंद।।’ हे प्रेरणादायी गीत आवेशपूर्ण ढंगात सादर केले. पहिलीच्याच द्वितीय वर्गाने ‘देस रंगीला रंगीला...’ हे सदाबहार गीत आकर्षक नृत्याविष्कारासह सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या चिमुकल्यांना महेश पगार, अनिकेत कांडेकर, योगेश हिंगे, शीला आवारे, शुभांगी दजगुडे, देवकी चव्हाणके यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी एकसुरात गायलेल्या ‘आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ या समूहगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या तिरंगी टोप्या अन् भारतमातेच्या केलेल्या जोशपूर्ण जयजयकाराने व देशभक्तीच्या स्पंदनांनी परिसर भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सुखावलेल्या उपस्थितांनी बाल कलाकारांना रोख बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सरपंच सुनीता सैंद, शालेय समिती अध्यक्ष सुदेश खुळे, रंगनाथ खुळे, उत्तम कुलथे, पालक संघाचे उपाध्यक्ष प्रवीण तिडके, दीपक खुळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य शरद रत्नाकर यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर राजेंद्र भावसार यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक गुलाब सय्यद व आर. के. तांबे यांनी आभार मानले. (वार्ताहर),