चतुर्मासानिमित्त बाजारपेठेत धार्मिक ग्रंथ दाखल
By Admin | Updated: July 7, 2016 00:32 IST2016-07-06T23:32:38+5:302016-07-07T00:32:11+5:30
चतुर्मासानिमित्त बाजारपेठेत धार्मिक ग्रंथ दाखल

चतुर्मासानिमित्त बाजारपेठेत धार्मिक ग्रंथ दाखल
नाशिक : आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळाला हिंदू संस्कृतीत धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, या काळात केलेल्या व्रतवैकल्यांमुळे पुण्यसंचय प्राप्त होतो, अशी आख्यायिका आहे. आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून, शहरातील बाजारपेठेत विविध धार्मिक ग्रंथ विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
आपला संपूर्ण चतुर्मास, नवनाथ भक्तिसार, गुरूचरित्र, शिवलीलामृत, काशीखंड, हरिविजय हे आणि असे विविध ग्रंथ शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शहरात विविध मंदिरांमध्ये सार्वजनिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, या प्रवचनांचे घरीही पारायण करता यावे यासाठी धार्मिक ग्रंथांची खरेदी करण्याकडे भाविकांचा विशेष कल दिसून येतो. अलीकडच्या धकाधकीच्या आणि व्यस्त दिनक्रमामुळे अनेकांना ग्रंथ वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्या ग्रंथांचा कथासार किंवा सारामृत अशा लहान स्वरूपातील पोथ्यांनाही विशेष मागणी असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत आहे.
चतुर्मासानिमित्त ग्रंथ किंवा पोथ्यांप्रमाणेच कहाणीसंग्रह, सत्यनारायण पूजा विधी, गणेशपूजा अशा पुस्तकांनाही विशेष मागणी आहे. चतुर्मासाच्या ग्रंथात चार महिन्यांव्यतिरिक्त वर्षभरात येणाऱ्या विविध सणांची माहिती, आरती, कहाणी यांचा समावेश असल्याने या ग्रंथाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नाशिक धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध असल्याने याठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविकांचाही धार्मिक ग्रंथ खरेदीकडे विशेष कल दिसून येतो. धार्मिक ग्रंथांंमध्ये अठरा पुराणांचा उल्लेख असून यात पद्मपुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, शिव पुराण, नारद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, हिरवंश पुराण आदिंच्या विक्रीत तसेच उपलब्धतेत वाढ झाली आहे.
नित्यस्तोत्र तसेच धार्मिक ग्रंथ अगदी पाच रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असून, उत्कृष्ट बार्इंडिंग आणि विविध आकार यावरून ग्रंथांच्या किमतीमध्ये फरक बघायला मिळतो. साधी बार्इंडिंग, रेशमी बार्इंडिंग, अक्षराचा टाईप, सचित्र माहिती अशा आकर्षक धार्मिक ग्रंथांना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. धार्मिक पुस्तकांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याच्या प्रकाशन संस्थांप्रमाणे स्थानिक प्रकाशकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)