सेसच्या निधीवरून पुन्हा भडका, सदस्यांची सीईओंकडे धाव
By Admin | Updated: July 26, 2016 23:50 IST2016-07-26T23:50:59+5:302016-07-26T23:50:59+5:30
जलयुक्त शिवार : जिल्हाधिकारी कार्यालयाचा खोडा

सेसच्या निधीवरून पुन्हा भडका, सदस्यांची सीईओंकडे धाव
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून राखीव ठेवण्यात आलेल्या अडीच कोटी रुपयांच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने काही अटी-शर्ती टाकल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही आमच्या सेस गाळ काढणे आणि नालाखोलीकरण चालत नसताना खासगी संस्थांकडून लोकसहभागातून हीच कामे कशी चालतात? असा प्रश्न आता सदस्यांनी उपस्थित केला आहे.
ताहाराबाद गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासोबत पिंपळकोठा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. डॉ. प्रशांत सोनवणे यांनी त्यांच्या गटातील कातरवेल ते पिंपळकोठा दरम्यानच्या पाटचारीचे काम जलयुक्त शिवार अभियानातून सुचविले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेचे प्रस्ताव मंजूर करताना टाकलेल्या दहा प्रकारच्या अटी-शर्तीमध्ये गाळ काढणे व नाला खोेलीकरणाची कामे घेता येणार नाहीत, असे नमूद केल्यानंतर कातरवेल ते पिंपळकोठा हे नाला खोलीकरणाचे काम घेता येणार नसल्याचे लघुपाटबंधारे विभागाने स्पष्ट करताच डॉ. प्रशांत सोनवणे यांनी पिंपळकोठाचे माजी सरपंच नितीन भामरे यांच्यासह भाऊसाहेब नांद्रे, भाऊसाहेब भामरे, संजय भामरे आदिंसह मंगळवारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. त्यावेळी गावची मागणी असल्यानेच आपण हे काम प्रस्तावित केल्याचे डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मिलिंद शंभरकर यांना सांगितले. त्यामुळे शंभरकर यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना बोलावून घेत त्यांना याबाबत विचारणा केली.
वाघमारे यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने अटी-शर्ती सुचविल्याने हे काम तांत्रिकदृष्ट्या घेता येणार नसल्याचे सांगितले. त्यावरून सेस निधी जिल्हा परिषदेचा असताना आणि सदस्यांनी सुचविलेले काम होणे अपेक्षित असताना या आडकाठ्या कशाला? असे डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मिलिंद शंभरकर यांना सांगितले. त्यानंतर या कामांचे अंदाजपत्रक पाहून त्यात अटी-शर्तींचा भंग होणार नसल्यास या कामांना मंजुरी देण्याची तयारी चंद्रशेखर वाघमारे यांनी दर्शविल्याने या वादावर पडदा पडला. (प्रतिनिधी)