घोटी : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसने बुधवारी घोटी टोल नाका बंद पाडत ठिय्या आंदोलन केले. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात भरण्यात येतील असे लेखी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे व त्यांच्या शिष्टमंडळास दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीने महामार्गावरील खड्यांची पाहणी केली. जवळपास ८० टक्के खड्डे भरले असून बाकी खड्डे भरण्याचे काम सुरु असल्याचे पाहणीत दिसले, परंतु पूर्णत: खड्डे भरले न गेल्याने घोटी येथील टोल नाका बंद करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठिय्या मांडत आंदोलन केले. यांनतर टोल न भरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांना सोडले. खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे भरले गेल्याने अशा खड्ड्यातील पेव्हर ब्लॉक काढून चांगल्या रितीने खड्डे भरण्यास वेळ लागत आहे. महिन्याच्या अखेर पर्यंत संपूर्ण मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्ता खड्डेमुक्त होईल असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी दिलीप खैरे यांना सांगितले. अपघातात मरण पावलेल्या पंढरी भागले (नांदगाव ता.इगतपुरी) व्यक्तीच्या कुटुंबियांना १२ लाखाची मदत टोल कंपनीने दिल्याने प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांचा सत्कार केला. यावेळी बाळासाहेब कर्डक, अॅड.रविंद्र पगार, अंबादास खैरे, पुरूषोत्तम कडलग, सोमनाथ बोराडे, उमेश खातळे, प्रल्हाद जाधव, योगेश निसाळ, मुख्तार शेख, सुनील वाजे, उदय जाधव, गोरख बोडके, शिवा काळे, बाळासाहेब गीते, ज्ञानेश्वर फोकणे, मकरंद सोमवंशी आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खड्डे मुक्तीसाठी राष्ट्रवादीने घोटी टोल नाका पाडला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:39 IST