जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:50+5:302021-01-13T04:36:50+5:30
नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘कायाकल्प’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्कार
नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘कायाकल्प’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य संस्थांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे मुंबई येथून तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा रुग्णालयातून ऑनलाइन उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, २०१९-२० या आर्थिक वर्षात आरोग्य विभागाकडून पुरविण्यात आलेल्या सेवासुविधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयास ‘कायाकल्प’ या राज्यस्तरीय रुपये ५० लाखांच्या प्रथम पुरस्काराने तर मालेगावच्या सामान्य रुग्णालयास रुपये २० लाखांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, चांदवड, त्र्यंबक, येवला, निफाड या उपजिल्हा रुग्णालये तसेच पेठ, नांदगाव, घोटी, लासलगाव, उमराणे, इगतपुरी या ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी रुपये एक लाखाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला; ही जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.