पुरवणी यादीला उमेदवारांनी दर्शविला नकार
By Admin | Updated: April 1, 2017 01:22 IST2017-04-01T01:21:56+5:302017-04-01T01:22:11+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी गुरुवारी (दि. ३०) पॅनलप्रमुख आणि उमेदवारांसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

पुरवणी यादीला उमेदवारांनी दर्शविला नकार
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी गुरुवारी (दि. ३०) पॅनलप्रमुख आणि उमेदवारांसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. मतदान आणि मतमोजणी कार्यक्रमाबाबत सर्वांना माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पॅनलप्रमुख आणि उमेदवारांनी विविध मागण्यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर अक्षरश: भडीमार केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर माध्यमांमधून अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याच्या बातम्या आल्यानंतर सभासदांनी वाचनालयाकडे आपले नाव मतदार यादीत असावे यासाठी अर्ज केले होते. यानुसार प्राप्त झालेल्या ३५ ते ४० उमेदवारांची पुरवणी यादी बनविण्यात आली. प्रारूप मतदारयादीत ज्या मतदारांची नावे होती त्यांची नावे अंतिम मतदार यादीतून गायब झाल्याने सावानाची अंतिम मतदारयादीच सदोष असल्याची बाब समोर आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी वाचनालयातील कर्मचाऱ्यांकडूनच ही चूक झाल्याची कबुली दिली. ग्रंथमित्र पॅनलकडून मात्र ही पुरवणी यादी वापरात यावी, अशी मागणी करण्यात आली; मात्र मतदानाला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना पुरवणी यादी तयार झालीच कशी असा सवाल विरोधकांनी करत गोंधळ घातला आणि भणगे यांनी ही यादी जोडण्यास नकार दिला. हा वाद शमत नाही तोच धर्माजी बोडके यांनी डिसेंबरमध्ये १४ जणांची वर्गणी भरल्यानंतर प्रारूप मतदारयादीत असलेले नाव अंतिम यादीतून गायब कसे झाले याचे लेखी उत्तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी लावून धरली. सार्वजनिक वाचनालयाच्या अनेक महिला सभासदांचे विवाहानंतर आडनाव बदलले असल्याने एका उमेदवाराकडून लग्नानंतरच्या आडनावाचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली, परंतु जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी आक्षेप नोंदवत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मतदारयादीतील नावानुसारच पडताळणी करण्यात आली आणि या नावानुसारच अर्जांची छाननी करण्यात आल्याने मतदारयादीतील नावाप्रमाणेच मतदाराकडे ओळखपत्राची मागणी करण्यात यावी, असे ठाम मत मांडले. यावेळी ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार अॅड. अभिजित बगदे यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सूचना केल्यानंतर बेळे यांनी याही सूचनेवर हरकत घेत आपले म्हणणे रेटून नेले. जनस्थान पॅनलमधील उपाध्यक्षपदाचे उमेदवार अरुण नेवासकर यांनी मतदानाच्या दिवशी वाचनालय परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाचनालयातर्फे पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून, अनेक उमेदवारांनी यावेळी महिला हवालदारांचासुद्धा बंदोबस्तात समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मतदानाची वेळ वाढविण्यास नकार
या बैठकीदरम्यान उमेदवारांकडून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाची नियोजित वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही बाब फेटाळून लावत मतदानाच्या दिवशी ५ वाजता जे मतदार सावानाच्या आवारात उपस्थित असतील त्यांना मतदान करण्यासाठी प्रवेश दिला जाईल, अशी माहिती दिली. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला असून, मतदानाच्या दिवशी सावानाच्या आवारात मतदारांची तसेच उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी कापड किंवा ताडपत्री लावण्यात येणार असल्याचे भणगे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी उपस्थित उमेदवारांना मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती दिली, तसेच मतदानप्रक्रिया कशी असेल, उपस्थित कर्मचारी आणि पॅनल प्रतिनिधी देण्याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. मतपत्रिकेचा नमुना तसेच मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी कशी सील केली जाणार आहे, याबाबतही माधवराव भणगे यांनी मार्गदर्शन केले.
अशी होणार मतदानप्रक्रिया
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी बोलावलेल्या बैठकीत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची माहिती दिली. मतदानासाठी सात टेबल मांडण्यात येणार असून, प्रत्येक टेबलजवळ एका पॅनलचे दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
मतदानाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी आहे, तर मतमोजणी सोमवारी (दि. ३) सकाळी १० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सात ते दहा टेबल मांडण्यात येणार आहे. मतमोजणी दरम्यान सुरुवातीला अवैध आणि बाद मतपत्रिका बाजूला काढण्यात येणार आहे. २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे करून प्रारंभी कार्यकारी मंडळ नंतर उपाध्यक्ष आणि सगळ्यात शेवटी अध्यपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.