मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना
By Admin | Updated: May 7, 2017 00:18 IST2017-05-07T00:18:27+5:302017-05-07T00:18:38+5:30
नाशिक : महापालिकेत सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी दणका दिला होता.

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत एकाच विभागात एकाच जागी वर्षानुवर्षांपासून भुजंगासन घालून बसलेल्या सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दणका दिला होता. महापालिकेच्या इतिहासात एकाच वेळी झालेल्या बदल्यांचा हा ‘गेडाम पॅटर्न’ चर्चेत ठरला होता. मात्र, गेडाम यांच्या बदलीनंतर वर्षभरातच मर्जीतल्या अनेक कर्मचाऱ्यांची पूर्वीच्याच विभागात पुनर्स्थापना झालेली असून, प्रशासनानेच ‘गेडाम पॅटर्न’ गुंडाळून ठेवला आहे. दरम्यान, गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी बदल्यांविषयक धोरण नियमावली तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, अद्याप नियमावलीची प्रतीक्षा कायम असून, यावर्षी बदल्यांची चर्चाही ऐकायला मिळत नाही.
महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली होती. वर्षानुवर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. गेडाम यांनी पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, तर दुसऱ्या टप्प्यात २८५ लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना झटका देत मुख्यालयातून त्यांची रवानगी विभागीय कार्यालयांमध्ये केली होती. गेडाम यांच्या या दणक्यामुळे अनेक कामचुकारांची कोंडी झाली होती. प्रशासकीय कामकाजात झालेल्या या साफसफाई मोहिमेचे स्वागतही झाले आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची टीकाही झाली.
गेडाम यांची मागील वर्षी जूनमध्ये बदली झाल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याची ओरड काही विभागप्रमुखांकडून झाली. आपल्या मर्जीतल्या लोकांची अन्यत्र बदली झाल्याने विभागप्रमुखांचीही गैरसोय झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी काही बदल्यांबाबत फेररचना केली. परंतु, गेल्या वर्षभरात बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना झाली असून, अनेकांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेवर ठाण मांडले आहे. त्यात काही कर्मचाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव तर काहींची लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवरून झाली असून, ज्या प्रशासनाने बदल्यांचा कठोर निर्णय घेतला त्याच प्रशासनाने गेडाम पॅटर्न पूर्णपणे गुंडाळून ठेवत अनेकांना ‘अभय’ दिले आहे.