दोन वर्षांत समान गुन्ह्यांची नोंद
By Admin | Updated: January 9, 2016 00:14 IST2016-01-09T00:13:46+5:302016-01-09T00:14:03+5:30
भद्रकाली पोलीस ठाणे : सरकारी नोकर हल्ल्यात किरकोळ वाढ

दोन वर्षांत समान गुन्ह्यांची नोंद
नाशिक : जुने नाशिकमधील गावठाण परिसर, अरुंद रस्ते, बहुसंख्य हिंदू-मुस्लीम समुदायातील नागरिकांचे वास्तव्य यामुळे कधीही दंगल होण्याची शक्यता यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी भद्रकाली पोलिसांना सज्ज असावे लागते़ या पोलीस ठाण्यात गत दोन वर्षांत दाखल गुन्ह्यांची संख्या समान असून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, पळवून नेणे व सरकारी नोकरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़
व्हिडीओ गल्ली, जुगार, मटका, भांग, वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची विक्री यासाठी हा परिसर ओळखला जातो़ २०१४ मध्ये या पोलीस ठाण्यात ४८२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर २०१५ मध्येही ४८२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल समाधानकारक असली तरी या परिसरात चोरी-छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष लक्ष देण्याची आवश्यकता आहे़
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेला भांग व अफू व्यवसायावर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन व उपायुक्त एऩ अंबिका यांनी स्वत: छापा टाकला होता़ याबरोबरच जुगार, मटका हे व्यवसायही चांगले फोफावल्याचे दिसून येतात़
बहुसंख्य हिंदू-मुस्लीम वस्ती असल्यामुळे द्वारका, शिवाजी चौक या परिसरात दोन गटांमध्ये होणारा तणावाकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे़ याबरोबरच शालिमार परिसरातील रिक्षावाल्यांची दादागिरी, मेनरोडवर होणाऱ्या महिलांच्या चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्याची गत दीड वर्षांपासून धुरा सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दाखल गुन्ह्यांची संख्या समान ठेवून गुन्ह्यांची उकल केली असली तरी घरफोडी, आर्थिक गुन्हे, चेनस्नॅचिंगचे मोठे आव्हान आहे़