महापालिकेच्या अॅपवर ५८६ रक्तदात्यांची नोंदणी
By Admin | Updated: September 23, 2015 22:10 IST2015-09-23T21:59:33+5:302015-09-23T22:10:10+5:30
बांधिलकी : गरजूंना मिळणार मदतीचा हात

महापालिकेच्या अॅपवर ५८६ रक्तदात्यांची नोंदणी
नाशिक : महापालिकेने नागरिकांच्या तक्रारी एका क्लिकसरशी मार्गी लावण्यासाठी विकसित केलेले ‘स्मार्ट नाशिक’ अॅप आतापर्यंत दहा हजाराहून नागरिकांनी डाउनलोड केले आहे. याच अॅपवर महापालिकेने सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून रक्तदात्यांची सूची उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत शहरातील ५८६ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. भ्रमणध्वनी क्रमांकासह रक्तगटाची नोंदणी केल्याने गरजू रुग्णांना तत्काळ मदतीचा हात मिळणार आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट नाशिक’ हे अॅप संगणक विभागाचे प्रमुख प्रशांत मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक विकसित केले. या अॅपवर नागरिकांना आपल्या भागातील तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे महापालिकेला सदर तक्रारींची दखल तत्काळ घेता येणे शक्य होणार आहे. सदर अॅपला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत दहा हजाराहून अधिक नागरिकांनी अॅप डाउनलोड करून घेतले आहे.