प्रादेशिक संग्रहालय पर्यटकांच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: May 18, 2016 20:58 IST2016-05-18T20:55:00+5:302016-05-18T20:58:40+5:30

ओघ घटला : आता पुन्हा सरकारवाड्यात स्थलांतराची तयारी

Regional museum waiting for tourists | प्रादेशिक संग्रहालय पर्यटकांच्या प्रतीक्षेत

प्रादेशिक संग्रहालय पर्यटकांच्या प्रतीक्षेत

नामदेव भोर, नाशिक
पूर्वजांनी सोडलेला विविध वस्तूकलेचा अमूल्य ठेवा जनतेच्या प्रदर्शनार्थ ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागांतर्गत नाशिकमध्ये स्थापन करण्यात आलेले प्रादेशिक वस्तुसंग्रहालय इतिहासप्रेमी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. फाळके स्मारकात असलेले हे संग्रहालय पर्यटकच येत नसल्याने ‘जैसे थे’ असून, बहुतांशी कुलूपबंदच असते. त्यामुळे आता या वस्तुसंग्रहालयाची सरकारवाड्यात स्थलांतराची तयारी सुरू आहे.
महापालिकेने साकारलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या परिसरात २००१ मध्ये हे संग्रहालय सुरू करण्यात आले. या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे सापडलेली व या पाच जिल्ह्यांमधून दान स्वरूपात मिळालेल्या वस्तू व पुरातन अवशेष आदि प्रदर्शनाकरिता ठेवण्यात आल्या आहेत. संग्रहालयातील प्रादेशिक वस्तूंमध्ये शस्त्रास्त्र दालनाबरोबरच पाषाणशिल्पे, मूर्ती, धातूशिल्प, नाणी, रंगचित्रे व छायाचित्रे दालन आदि ऐतिहासिक दुर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. या पुरातन वस्तू प्रादेशिक विभागाने संकलित केल्या असल्या तरी अनेक इतिहासपे्रमी व संस्थांनी अनेक पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट म्हणून दिलेल्या आहेत. या वस्तुंची माहिती इतिहास अभ्यासकांना व्हावी, असा यामागचा हेतू असला तरी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याने पुरातन वस्तूंचा ठेवा दुर्लक्षित होत आहे.
११ आॅक्टोबर १९८५ रोजी स्थापन झालेल्या या संग्रहालयाने सुरक्षित इमारतीअभावी सरकारवाडा, सिडकोतील खासगी इमारत, फाळके स्मारक असा प्रवास केला. आता पुन्हा सरकारवाडा या राज्य संरक्षित स्मारकात हे संग्रहालय स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. हे ठिकाण पंचवटी रामकुंड परिसरापासून जवळ असल्याने येथे येणारे पर्यटक संग्रहालयाला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

कुंभमेळ्यात पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सध्या सुट्ट्या असतानाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सध्या येथे मदतीसाठी कर्मचारी नसले तरी इतिहास अभ्यासकांना व पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे पर्यटकांनी फाळके स्मारकात असलेला हा ऐतिहासिक ठेवा बघण्यासाठी संग्रहालयाला भेट दिली पाहिजे.
- श्रीनिवास कोतवाल,
संग्रहालय अभिरक्षक, नाशिक


पहारेकऱ्याची गरज

पुरातन व दुर्मीळ वस्तूंच्या रक्षणासाठी पहारेकरी नेमण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले असले तरी फाळके स्मारकात या दुर्मीळ व बहुमूल्य वस्तूंच्या रक्षणासाठी पहारेकरीही नाही. अनेकदा अभिरक्षकांना इतर कामांसाठी बाहेर जाताना पहारेकरी नसल्याने संग्रहालयाचे दालन बंद करावे लागत असल्याने आलेल्या पर्यटकांनाही आल्या पावली परतावे लागले, असे सूत्रांनी सांगितले.
 

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या या संग्रहालयात मराठा-मोगल काळातील लढाईची हत्यारे, जुनी छायाचित्रे, जुने शिलालेख, काही मूर्ती, छोट्या-मोठ्या सुमारे मूर्ती आहेत. हे संग्रहालय म्हणजे भूतकाळात एक फेरफटका मारण्याचे साधन आहे. परंतु फाळके स्मारकाची रया गेली त्यामुळे पर्यटकांचे येणे कमी होत गेल्याने या वस्तू पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Regional museum waiting for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.