समाजाभिमुख सिद्धांतांचा राज्यकर्त्यांना विसर
By Admin | Updated: March 18, 2015 00:33 IST2015-03-18T00:33:27+5:302015-03-18T00:33:36+5:30
अनिल सद्गोपाल : ‘शिक्षणाचे माध्यम आणि बाजार’ यावर विश्लेषण

समाजाभिमुख सिद्धांतांचा राज्यकर्त्यांना विसर
नाशिक : भारतीयांचा मातृभाषेविषयीचा विश्वास संपुष्टात आणून इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे भारतावर सत्ता भोगली. दरम्यानच्या काळात इंग्रजी भाषा, इंग्रजी विचारधारा, इंग्रजी जीवनशैलीचे प्रस्थ वाढविण्याचा त्यांनी पूरेपूर प्रयत्न केला. त्याचा प्रभाव आजही भारतात प्रकर्षाने जाणवतो, हे खेदाने सांगावे लागत आहे. ब्रिटिश साम्राज्यवादापुढे भारतीय महान नेत्यांनी मांडलेल्या शिक्षणशास्त्राविषयीच्या मूळ समाजाभिमुख प्रगतिशील सिद्धांतांचाही आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांना विसर पडला असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल सद्गोपाल यांनी केले.
शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व एस. एस. जोशी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून सद्गोपाल बोलत होते. हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ‘भाषिक विविधता, शिक्षणाचे माध्यम व बाजार’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, इंग्रजी भाषेशिवाय आधुनिक विचार अन्य भाषांमधून मांडण्याचे सामर्थ्य नसल्याचा विचार १८३५ साली लॉर्ड मॅकेले याने पुढे आणला. त्याने या विचाराने सर्वप्रथम भारतीयांचे मातृभाषेशी नाते तोडले. भारतातील सर्व भाषा इंग्रजी भाषेसमोर भारतीयांकडून दुय्यम समजल्या जाऊ लागल्या आहेत. एकूणच आजच्या या आधुनिकतेच्या युगात भारतीयांना आपापल्या मातृभाषेवरचा विश्वासही उडाला असल्याचे सद्गोपाल यांनी सांगितले.
दरम्यान, मातृभाषेविषयीचा अभिमान आणि विश्वास अधिक बळकट करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या महान नेत्यांच्या साहित्याचा अभ्यास गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी देत त्यांचे मातृभाषेविषयीचे प्रेम अधोरेखित करणारे विविध दाखलेही सांगितले. आजदेखील इंग्रज साम्राज्यवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून कायम ठेवला जात असून, त्याला स्थानिक राज्यकर्तेही हातभार लावत आहेत. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातही भांडवलशाही फोफावत चालली असल्याचे सद्गोपाल यावेळी म्हणाले. व्यासपीठावर प्रदीपकुमारदास गुप्ता, छाया देव, श्रीधर देशपांडे, अॅड. संतोष म्हस्के, सचिन मालेगावकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)