आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावरच कारभार
By Admin | Updated: May 5, 2015 01:31 IST2015-05-05T01:31:33+5:302015-05-05T01:31:57+5:30
आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावरच कारभार

आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावरच कारभार
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर करून दीड महिना लोटला तरी अद्याप स्थायीकडून महासभेवर अंदाजपत्रक सादर न झाल्याने प्रशासनाकडून आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावरच कारभार चालविला जात आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपले पहिलेच अंदाजपत्रक २० मार्च रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना सादर केले होते. त्यानंतर आठवडाभरातच निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सभापती राहुल ढिकले यांचाही समावेश होता. स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे आरुढ होऊन आता महिना उलटला तरी स्थायीवर सादर झालेल्या अंदाजपत्रकावर अद्याप चर्चा होऊन त्यात दुरुस्त्या सुचविलेल्या नाहीत. त्यामुळे महासभेवरही अंदाजपत्रक सादर होऊ शकलेले नाही. तत्कालीन सभापती राहुल ढिकले हेच महासभेवर अंदाजपत्रक सादर करणार आहेत; परंतु ढिकले यांचे पिताश्री व माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे निधन झाल्याने अंदाजपत्रकावर चर्चा होऊ शकली नाही. आता ढिकले जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत गुंतल्याने अंदाजपत्रकाला विलंब होत आहे. सर्वसाधारणपणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाला मार्च महिनाअखेरीसच स्थायी व महासभेवर मंजुरी मिळणे अपेक्षित असते; परंतु यंदा आयुक्तांकडूनही स्थायीवर अंदाजपत्रक उशिराने सादर झाले. आता मे महिना उजाडला तरी स्थायीकडून महासभेवर अंदाजपत्रक मंजुरीसाठी आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून आयुक्तांचेच अंदाजपत्रक गृहित धरून कारभार चालविला जात आहे. (प्रतिनिधी)