गिरणारे उपबाजारासाठी जागा देण्यास नकार
By Admin | Updated: September 6, 2016 23:08 IST2016-09-06T23:08:12+5:302016-09-06T23:08:25+5:30
ग्रामसभेत ठराव : पालकमंत्र्यांना निवेदन

गिरणारे उपबाजारासाठी जागा देण्यास नकार
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गिरणारे येथील खासगी देवस्थानच्या जागेत उपबाजार सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी गिरणारे ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून गिरणारे येथे खुले टमटा मार्केट भरत आहे. ते खुले मार्केट तसेच सुरू ठेवावे. या मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे मिळतात, कुठलेही कमिशन नाही, कुठलीही दादागिरी नाही. नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो. या निर्णयामुळे गिरणारे येथे आमचे जे मार्केट सुरू आहे त्याला फायदाच होणार आहे. मात्र बाजार समितीला स्वत:चा स्वार्थ व अर्थकारण साधण्यासाठी गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्यासाठी देवस्थानची जागा हवी आहे. मात्र ग्रामपंचायतीने ही जागा देण्यास १५ आॅगस्ट २०१६ च्या ग्रामसभेतील ३८ क्रमांकाच्या ठरावानुसार विरोध केला आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला गिरणारे येथे नव्याने उपबाजार सुरू करू देऊ नये, अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमरण उपोषण करू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नितीन थेटे, संजय थेटे, लुखाजी थेटे, दत्तात्रय थेटे, निवृत्ती घुले, आत्माराम थेटे, शिवाजी थेटे, संदीप थेटे, बाळासाहेब कसबे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)