निमाचा कारभार विश्वस्तांकडे देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:37+5:302021-08-13T04:19:37+5:30
निमातील गटबाजी उफाळून आल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी विद्यमान कार्यकारिणी, विश्वस्त मंडळ ...

निमाचा कारभार विश्वस्तांकडे देण्यास नकार
निमातील गटबाजी उफाळून आल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी विद्यमान कार्यकारिणी, विश्वस्त मंडळ आणि विशेष कार्यकारिणी समिती या तिघांचेही अर्ज निकाली काढून डिसेंबर २०२० मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिपटे, धर्मदाय निरीक्षक पंडितराव झाडे, धुळ्याचे ॲड. देवेंद्र शिरोडे यांची तीन सदस्यीय प्रशासकीय समिती नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून आता निमाचा कारभार सुरू आहे. दरम्यान, निमाचा कारभार सुरळीत व्हावा म्हणून मी नाशिककर फोरमने पुढाकार घेऊन पीयूष सोमाणी, विवेक गोगटे, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, तुषार चव्हाण या पाच विश्वस्त सदस्यांकडे निमाचा कारभार द्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीवर सहधर्मदाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी बुधवारी (दि. ११) पीयूष सोमाणी, विवेक गोगटे, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, तुषार चव्हाण या पाचही उद्योजकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कार्यालयाने विश्वस्त नेमण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यात तुम्ही अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांची यादी तयार करून प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निमावर विश्वस्तांची नेमणूक करण्यात येईल. निमा ही उद्योजकांची संस्था आहे. ती उद्योजकांनीच चालवायची आहे, अशी स्पष्ट भूमिका सहधर्मदाय आयुक्त झपाटे यांनी मांडल्याचे समजते.
चौकट
विश्वस्तपदासाठी मागविले अर्ज
दरम्यानच्या काळात निमा या औद्योगिक संस्थेवर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने पात्र सभासदांची मुलाखत घेऊन विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विश्वस्तपदासाठी इच्छुकांनी अर्ज आणि बायोडाटा पाठवावा. त्यात लार्ज ॲण्ड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असा उल्लेख करावा. तसेच सभासद असल्याचा पुरावादेखील अर्जासोबत जोडावा. संस्थेवर किती विश्वस्त नेमले जातील. याबाबत नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता निमा संस्थेत कोणाची सत्ता हा वाद मिटणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल.