संदर्भ सेवा रुग्णालय गैरसोयींबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 00:02 IST2016-03-11T23:53:34+5:302016-03-12T00:02:35+5:30
पालकमंत्र्यांना निवेदन : पुरेशा सेवा मिळत नसल्याची आरोग्यदूत संघटनेची तक्रार

संदर्भ सेवा रुग्णालय गैरसोयींबाबत निवेदन
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेले नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असून, त्याबाबत शासन स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आरोग्यदूत सामाजिक संस्थेच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक विभागातील रुग्णांना यापूर्वी अतिविशिष्ट आरोग्य सेवांसाठी मुंबई व पुणे येथे जावे लागत होते, परंतु गोरगरीब जनतेला जवळच आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने
उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी नाशिक येथील शालिमार येथे अतिविशिष्ट आरोग्य सेवांसाठी १०० खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू करण्यात आले.
या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हृदय व मेंदूवरील उपचार करण्यासाठी अत्यंत उच्च दर्जाची मशिनरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यातील बहुतांश मशिनरी सातत्याने बंदच राहत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयातून उपचार करून घ्यावे लागतात. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू असूनही येथील केवळ ३० टक्केयंत्रणेचाच रुग्ण वापर करतात. त्यामुळे येथील अनागोेंदी कारभार दूर करून रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी आरोग्यदूत सामाजिक संस्थेचे समन्वयक तुषार जगताप, एम. एम. पाटील, विक्रांत चांदवडकर, योगेश नाटकर, विलास जाधव, विशाल कोशिरे, पवन पवार, विक्की पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)