गंगापूर धरण नव्हे समूहात साठा वाढल्यावर कपात रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:30+5:302021-07-23T04:11:30+5:30
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण प्रमुख असून त्या व्यतिरिक्त मुकणे धरणातूनदेखील पुरवठा होत असतो. यंदा पावसाने ओढ ...

गंगापूर धरण नव्हे समूहात साठा वाढल्यावर कपात रद्द होणार
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण प्रमुख असून त्या व्यतिरिक्त मुकणे धरणातूनदेखील पुरवठा होत असतो. यंदा पावसाने ओढ दिल्याने तसेच गंगापूर धरणातील साठा अगदी ३५ टक्क्यापर्यंत खाली गेल्याने अखेरीस पाणी कपात करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने नियोजन करून जोपर्यंत गंगापूर धरणात ५० टक्के साठा होत नाही तो पर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा गुरुवारी (दि. २२) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आणि नंतर पुढील आठवड्यापासून दर बुधवारी पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. मात्र, धरणात आता ५० टक्के साठा झाल्याने पाणी कपात रद्द हेाणार काय अशी शंका घेतली जात असताना आयुक्त केलास जाधव यांनी मात्र कपात रद्द करण्यास नकार दिला आहे.
गंगापूर धरणात नव्हे तर धरण समूहातदेखील पाणी वाढले पाहिजे. ते जोपर्यंत ५० टक्के होत नाही तोेे पर्यंत पाणी कपात रद्द होणार नाही, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
इन्फो...
गंगापूर धरण समूहात ४२ टक्के साठा
त्र्यंबकेश्वर तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरण आता ५३.३५ टक्के (३००४) इतका साठा झाला असला तरी गंगापूर धरणात येणाऱ्या आणखी तीन धरणांचा विचार करून एकूण समूहाचा साठा बघितला तर तो ४२ टक्के इतका आहे. यात काश्यपी धरणात २९, गौतमी गोदावरीमध्ये ३९ तर आळंदी धरणात ३९ टक्के इतका साठा आहे. म्हणजेच संकल्पित साठा १० हजार ११६ इतका असला तरी सध्या अवघा ४ हजार २४४ दश लक्ष घनफूट इतका साठा शिल्लक आहे.