गंगापूर धरणातील विसर्गात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:41+5:302021-09-24T04:16:41+5:30
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गंगापूर धरणक्षेत्रात सलग दोन ...

गंगापूर धरणातील विसर्गात कपात
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गंगापूर धरणक्षेत्रात सलग दोन दिवस चांगला पाऊस बरसल्याने गंगापूर धरण शंभर टक्क्यावर पोहोचले आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर धरणातून विसर्ग केला जात होता. सकाळापासून सुरू झालेला विसर्ग रात्री ८ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला हाेता. दिवसभरात ८,१२९ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. रात्री ११ वाजेपासून विसर्गात दोन हजार क्युसेकने कपात करण्यात आली. गुरुवारी दुपारपर्यंत धरणातून ५७१ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता.
सलग दोन दिवस धो-धोर बरसणाऱ्या पाऊस धारा बुधवारी सायंकाळनंतरच कमी झाल्याने धरणातून विसर्गात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून यामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पूरदेखील ओसरला असून काठावरील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले दुकानदार पुन्हा दुकानांची आवरासावर करताना दिसून आले. अनेकांनी आपल्या टपरी, दुकानांची डागडुजी करण्याला सुरुवात केली आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणातून पुन्हा पाणी साेडण्याची शक्यता कमीच आहे.
--इन्फो--
गंगापूरबरोबरच कालपासून सातत्याने विसर्ग सुरू असलेल्या दारणा, वालदेवी आणि कडवा धरणातील पाण्याचा विसर्गदेखील कमी करण्यात आला आहे. बुधवारी या धरणातून २,७०८ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू होता. गुरुवारी यात कपात करण्यात येऊन १,९०८ इतका विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातूनही केवळ ५७१ क्युकेस इतक्याच वेगाने पाणी वाहत होते. वालदेवीतून १८३ तर कडवा धरणातून ४२४ क्युसेक पाणी सोडले जात आहे. नांदुरमध्यमेश्वरमधील विसर्गदेखील कमी झाला आहे. येथून ९,४६५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता तर बुधवारी येथून १२,६३० क्युसेक इतक्या वेगाने मराठवाड्याकडे पाणी वाहिले.