रेडीरेकनरचे दर कायम राहण्याचे संकेत
By Admin | Updated: January 1, 2015 01:07 IST2015-01-01T01:07:06+5:302015-01-01T01:07:17+5:30
आज जाहीर होणार : नागरिकांना दिलासा

रेडीरेकनरचे दर कायम राहण्याचे संकेत
नाशिक : गेल्या वर्षी थेट २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढलेल्या जमिनींच्या बाजारमूल्यामुळे (रेडीरेकनर) जमिनींची खरेदी-विक्री व त्या अनुषंगाने बांधकाम क्षेत्रावर वाढीव दराचा भार कोसळून महागलेल्या घरांच्या किमती चालू वर्षी ‘जैसे थे’ राहण्याचे संकेत मिळू लागले असून, रेडीरेकनरचे दर कमी करण्यासाठी गेल्या वर्षभर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याच्या आधारे २०१५ मध्ये नाशिक जिल्ह्यात कोणतीही वाढ नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नगररचना विभागाकडून दरवर्षी १ जानेवारी रोजी संपूर्ण वर्षभरासाठी जमिनींचे बाजारमूल्य निश्चित केले जाते व त्याआधारेच व्यवहार होऊन शासनाला मुद्रांकापोटी कोट्यवधींचा महसूल मिळत असतो. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा नगररचना विभागाकडून मुद्रांक विभागाला रेडिरेकनर दराची प्रत देण्यात आली असून, गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१५ मध्ये कोणतीही वाढ न करता, २०१४ मध्ये करण्यात आलेले दर कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी झोननिहाय साधारणत: २० ते ४० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली होती. कागदोपत्री ती ४० टक्के दिसत असली, तरी प्रत्यक्षात ही वाढ ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यातूनच जमिनींच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होऊन बांधकाम क्षेत्राला मंदीचा तडाखा बसला होता.