रेडगाव खुर्द-सोनीसांगवी रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: October 23, 2015 22:15 IST2015-10-23T22:14:39+5:302015-10-23T22:15:22+5:30
वाहनधारक त्रस्त : डांबरीकरणाची मागणी

रेडगाव खुर्द-सोनीसांगवी रस्त्याची दुरवस्था
तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द ते सोनीसांगवी या तीन किमी अंतराच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आपण चाललोय तो रस्ता आहे की नाही हेच कळत नाही इतके खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण होते की खडीकरण हे समजणेदेखील शक्य नाही.
काजीसांगवीला माध्यमिक शिक्षणाकरिता रेडगाव खुर्द परिसरातील १००-१२५ विद्यार्थी सायकलने जातात. या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सायकलवरून पडणे, सायकली नादुरुस्त होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते.
या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, वाहेगाव साळ, काळखोडे येथील नागरिक खराब रस्त्यामुळे तालुक्याच्या गावी जाताना साळसाणे मार्गे पाच किमी अधिक अंतराने जाणे पसंत करतात.
या सर्वच गोष्टींचा विचार करता या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)