पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे अडले घोडे
By Admin | Updated: July 18, 2014 00:35 IST2014-07-18T00:13:25+5:302014-07-18T00:35:41+5:30
पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे अडले घोडे

पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे अडले घोडे
नाशिक : शहरात पूररेषा आखल्यानंतर महापालिकेने गावठाणातील वाड्यांना दुरुस्तीसाठी परवानग्या देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यापूर्वी महासभेत चर्चा होऊनही कार्यवाही होत नसल्याने गुरुवारी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. तथापि, आयुक्तच उपस्थित नसल्याने या विषयावरील चर्चा पुढील सभेत करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
२००८ मध्ये महापूर आल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या पूररेषा आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांच्या परवानग्या महापालिकेकडून स्थगित करण्यात आल्या आणि नवीन बांधकामांना परवानग्या देणेच बंद करण्यात आले आहे. त्याचा गावठाण भागातील वाड्यांना फटका बसला आहे. वाड्यांच्या दुरुस्तीसाठीही पालिका परवानगी देत नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. यासंदर्भात नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, शाहू खैरे, गुरुमित बग्गा आणि संजय चव्हाण यांनी पालिकेच्या गुरुवारच्या सभेत लक्षवेधी मांडली होती. वाडे दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वाडेमालक इमारती उभ्या करीत आहेत. त्यामुळे पालिकेचे विकास शुल्क बुडत आहे. त्याचा विचार करता पालिकेने वाड्यांच्या पुनर्विकासासाठी मान्यता द्यावी, त्यासाठी मिळकतधारकांना स्वत:च्या हमीवर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तथापि, आजच्या सभेस आयुक्त संजीवकुमार आणि नगररचना विभागाचे सहायक संचालक शेंडे अनुपस्थित असल्याने महापौरांनी पुढील सभेत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)