पुनर्वसूची दमदार हजेरी

By Admin | Updated: July 19, 2014 21:19 IST2014-07-18T01:02:52+5:302014-07-19T21:19:38+5:30

पुनर्वसूची दमदार हजेरी

Recycling Predatory Muster | पुनर्वसूची दमदार हजेरी

पुनर्वसूची दमदार हजेरी

 

नाशिक : मुंबईसह कोकणात धुवाधार कोसळणाऱ्या पण नाशिकला वाकुल्या दाखविणाऱ्या पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने अंतिम चरणात आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली आणि पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
गेल्या दीड महिन्यापासून वरुणराजा हुलकावणी देत होता. मृग, आर्द्रा नक्षत्रापाठोपाठ पुनर्वसूही कोरडे जाते काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत चालल्याने नाशिककरांच्या चिंता वाढल्या होत्या. महापालिकेने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर पाणीकपातीचे धोरण राबवित ७ जुलैपासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. दीड महिन्यात पावसाने किरकोळ हजेरी लावली परंतु त्याने समाधान होत नव्हते. मुंबईसह कोकण परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस धो-धो कोसळत असताना, नाशिकलाही पाऊस हजेरी लावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु केवळ आभाळ भरून येण्यापलीकडे चित्र बदलताना दिसत नव्हते. पर्जन्यवृष्टीसाठी शहरात काही धार्मिक संस्थांनी यज्ञ-अभिषेकादि कार्यक्रम करत वरुणराजाला साकडे घातले होते. दि. १६ ते २२ जुलै या कालावधीत देशभरात जोरदार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिल्यानंतर नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याची सुरुवात आज दुपारी झाली. आज सकाळपासूनच आभाळात ढगांनी गर्दी केली होती. दुपारनंतर पावसाने जोरदार सलामी दिली तेव्हा शहरवासीयांची एकच तारांबळ उडाली. परंतु दीर्घ कालावधीनंतर बरसणाऱ्या या पावसाचे नाशिककरांनी तक्रार न करता मनापासून स्वागत केले.
पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबले. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काही भागांत पावसाळी गटारीचे चेंबर्स उघडे करून देण्यात आले. मेनरोड, शिवाजीरोड, रविवार कारंजा या परिसरात रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. सायंकाळी बाजारपेठांमधील गर्दी ओसरली होती. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. पावसामुळे हवेतील गारव्याने नाशिककर सुखावले. (प्रतिनिधी)

Web Title: Recycling Predatory Muster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.