नोकर भरतीचा चेंडू सहकारच्या कोर्टात
By Admin | Updated: August 23, 2016 00:28 IST2016-08-23T00:27:47+5:302016-08-23T00:28:25+5:30
कामगार न्यायालय: जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शन

नोकर भरतीचा चेंडू सहकारच्या कोर्टात
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची वादग्रस्त ठरलेली कंत्राटी नोकरभरती स्थगितीच्या आणि रद्द होण्याच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. या भरतीबाबत नेमके काय करावे? याबाबतचे मार्गदर्शन आता जिल्हा बॅँकेच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे मागविल्याचे वृत्त आहे.
शनिवारी (दि.२०) झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे प्रसारमाध्यमातून जाहीर झाले होते. त्यामुळेच की काय? कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थेट कामगार न्यायालयात अर्ज केला. कामगार न्यायालयाने भरतीप्रक्रिया रद्द करू नये, म्हणून जिल्हा बॅँकेला आदेश दिल्याचे पत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बॅँकेकडे दिले होते. त्या पत्रावरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी कंत्राटी नोकरभरती नियमानुसार नसल्याने ३० आॅगस्टपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेला दिले आहेत. सोमवारी जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे कंत्राटी नोकरभरती कशी व कोणत्या नियमाखाली रद्द करावी? याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे कळते. (प्रतिनिधी)