संमेलनाच्या नांदीलाच राजकारण्यांची भरती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:36+5:302021-02-05T05:46:36+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमुख समित्यांमध्ये जिल्ह्यातील राजकारणी आणि नेत्यांचीच नियुक्ती करण्यात आली ...

संमेलनाच्या नांदीलाच राजकारण्यांची भरती !
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमुख समित्यांमध्ये जिल्ह्यातील राजकारणी आणि नेत्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नांदीलाच करण्यात आलेली ही राजकारण्यांची भरती जिल्ह्यासह राज्यातदेखील चर्चेला उधाण आणणारी ठरत आहे. संमेलन नक्की साहित्य आणि साहित्यिकांचे आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे याचीच चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला राजकारणी नको, अशी महामंडळाने गतवर्षापासूनच भूमिका घेतली असून, यंदाचे उद्घाटनदेखील लेखकाच्या हस्तेच करण्याचा मानस अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेली घोषणा होऊन २० तास उलटायच्या आतच लोकहितवादी मंडळाने जाहीर केलेल्या समित्यांच्या यादीत सर्वाधिक राजकारण्यांचाच भरणा असल्याचे दिसून येत आहे. मुळात स्वागताध्यक्षपदी भुजबळ यांची नियुक्ती हाच राज्यात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेवढे कमी म्हणून की काय मंडळाने उपाध्यक्ष पदांची खिरापत चौघांच्या नावे वाटत नवीनच पायंडा पाडला आहे. त्यात सर्व जागा गोएसोची असल्याने तसेच डॉ. मो. स. गोसावी हे ज्ञानदानाच्या क्षेत्रातील अधिकारी पुरुष असल्याने त्यांच्यासारख्या ज्येष्ठाचे नाव उपाध्यक्षपदी समजू शकते. मात्र, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला संमेलनाचे उपाध्यक्षपद देऊन खुजे केले जात नाही का? संमेलन नाशकात आहे आणि ते जर सगळ्यांचे आहे तर त्या संमेलनाला भुसे, झिरवाळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाकडून संपूर्ण सहकार्य मिळणार नाही का? त्यासाठी त्यांची अशा नामधारी पदांवर नियुक्ती करण्याची गरज होती का, असा प्रश्नदेखील यानिमित्ताने चर्चेला आला आहे.
इन्फो
सल्लागार प्रतिनिधीतही तीच गत
सल्लागार समिती म्हणून मनपा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय यांचे सर्व प्रमुख तसेच दोन्ही कुलगुरुंची नियुक्ती योग्य आहे. मात्र, सल्लागार प्रतिनिधी नामक समितीमध्ये पुन्हा केवळ आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांचीच नियुक्ती करणे कितपत संयुक्तिक आहे, याचादेखील विचार व्हायला हवा होता. सल्लागार प्रतिनिधींमध्ये तरी किमान जिल्ह्यातील साहित्यिक, विविध सांस्कृतिक मंडळांचे जाणकार, अनेक साहित्य संमेलने किंवा किमानपक्षी २००५च्या साहित्य संमेलनात सक्रिय भूमिका बजावलेल्या मान्यवरांचा समावेश करणे आवश्यक होते, याच चर्चेला सध्या बहर आला आहे.
कोट
संमेलनासाठीच्या अनुदानासाठी आयोजकांना राज्य शासनाकडे जावेच लागते. तसेच ज्यांच्याकडे संमेलनात काही भूमिका असेल, अशा राजकारण्यांच्या व्यासपीठावरील वावराला महामंडळाचा आक्षेप नाही. केवळ कुणाही राजकारण्यांचा हस्तक्षेप होऊ नये, ही महामंडळाची अपेक्षा असून, त्याची निश्चितपणे पूर्तता केली जाणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या आणि महामंडळाच्या चौकटीतच सारे काही करण्यात येत आहे.
हेमंत टकले, विश्वस्त, लोकहितवादी मंडळ
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा. (मा. वाखारे साहेबांना दाखवून मगच पानावर घ्यावा. )