सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन लाख रुपयांचा परतावा
By Admin | Updated: July 9, 2017 00:45 IST2017-07-09T00:45:15+5:302017-07-09T00:45:40+5:30
नाशिक : दोन लाखांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक झालेल्या इसमाची रक्कम सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा मिळाली आहे़

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन लाख रुपयांचा परतावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : परदेशात झालेल्या खरेदीपोटी बचत खात्यातील दोन लाखांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक झालेल्या इसमाची रक्कम सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा मिळाली आहे़ सायबर पोलिसांनी यापूर्वी एका वृद्ध महिलेची मोठी रक्कम बँकेतून वळती होण्याआधी रोखली होती़ पोलिसांच्या या सतर्कतेचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे़
कॉलेजरोडवरील पारिजातनगरमधील रहिवासी अनिल सुरेश बाविस्कर (व्हाइट व्हिलो अपार्टमेंट) यांचे महात्मानगरच्या आयसीआयसीआय बॅँकेत बचत खाते आहे़ अज्ञात इसमाने २० ते २३ जून या कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने परदेशात विविध ठिकाणी खरेदी केली व त्या बिलापोटी बाविस्कर यांच्या बचत खात्यातील दोन लाख तीन हजार १५२ रु पये परस्पर वळते केले़ हा प्रकार लक्षात येताच त्यांनी २ जुलै रोजी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती़ पोलीस आयुक्तडॉ़रवींद्रकुमार सिंगल व सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला़ सायबर पोलीस ठाण्याच्या बँक सेलचे कर्मचारी कृष्णा राठोड व प्रदीप वाघ यांनी फिर्यादी बाविस्कर यांचे बचत खाते असलेल्या आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधून या फसवणुकीची माहिती दिली़ यानंतर बँकेने दखल घेत बाविस्कर यांची दोन लाख तीन हजार १५२ रुपयांची रक्कम पुन्हा त्याच्या खात्यावर वर्ग केली़