घरपट्टी थकबाकीदारांवर सोमवारी जप्तीची कारवाई
By Admin | Updated: February 5, 2016 23:04 IST2016-02-05T23:03:33+5:302016-02-05T23:04:10+5:30
महापालिका : मोठ्या थकबाकीदारांपासून प्रारंभ

घरपट्टी थकबाकीदारांवर सोमवारी जप्तीची कारवाई
नाशिक : महापालिकेने मार्चअखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी कंबर कसली असून, येता सोमवार (दि.८) मोठ्या थकबाकीदारांसाठी जप्तीचा वार ठरणार आहे. मनपाने थकबाकीदारांची यादी तयार ठेवली असल्याची माहिती घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्राहकांना नोटिसा बजावल्या असून, मुदतीत थकबाकी न भरल्याने आता जप्तीची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी महापालिकेने सुमारे ७५ कोटी रुपये घरपट्टीची वसुली केली होती. यंदा आतापर्यंत सुमारे ६४ कोटी रुपयांची वसुली झाली असून, १०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. महापालिकेने त्यासाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्याविरुद्ध आता जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ११०७ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. येत्या सोमवारी (दि. ८) मोठ्या थकबाकीदारांपासून जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांमार्फत मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार ठेवण्यात आली आहे. थकबाकीदारांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर थकबाकी भरावी, असे आवाहनही दोरकूळकर यांनी केले आहे.