वाहनतळांवर खासगी ठेकेदारांकडून वसुली

By Admin | Updated: April 11, 2016 00:17 IST2016-04-10T23:08:11+5:302016-04-11T00:17:50+5:30

मिलीजुली : कारवाईबाबत प्रशासन उदासीन

Recovery from private contractors on vehicles | वाहनतळांवर खासगी ठेकेदारांकडून वसुली

वाहनतळांवर खासगी ठेकेदारांकडून वसुली

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या वाहनतळांचा अद्याप कुणालाही ठेका दिलेला नसताना खासगी ठेकेदारांकडीलच कर्मचारी वाहनधारकांकडून वसुली करत असून, मनपा कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा सारा व्यवहार सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. संबंधित ठेकेदार व मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन आहे.
महापालिकेमार्फत बी. डी. भालेकर मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, चित्रमंदिर थिएटरच्या मागे, जिजामाता प्रसूतीगृहमागे आदि ठिकाणी वाहनतळांचा ठेका देण्यात येतो. प्रामुख्याने बी. डी. भालेकर मैदानातील वाहनतळापासून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होत असते. गेल्या काही महिन्यांपासून सदर वाहनतळांचा ठेका मनपाने दिलेला नाही. त्यामुळे सध्या महापालिकेचेच कर्मचारी वाहनशुल्क वसूल करत असतात, परंतु सदर वाहनतळांवर मनपाचे कर्मचारी न थांबता यापूर्वी ठेका चालविणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडूनच वाहनशुल्क वसूल केले जात असल्याची तक्रार वाहनधारकांमधून होत आहे. बऱ्याचदा याठिकाणी सदर कर्मचारी हे वाहनधारकांशी हुज्जत घालत असल्याचेही चित्र दिसून येत असते. वाहनशुल्क वसुली करताना पावतीही दिली जात नाही. जादा पैसे वसूल करत जात असल्याच्याही तक्रारी आहेत. सदर वाहनतळावर मनपा कर्मचारी न थांबता ते दिवसभराचा वसूल करण्यासाठीच वाहनतळावर येत असतात. ठेकेदार व मनपा कर्मचारी यांच्या संगनमताने हा व्यवहार सुरू असल्याचाही आरोप वाहनधारकांकडून होत आहे. दरम्यान, वाहनतळावरील या मिलिजुली कारभाराबाबत नागरिकांनी आयुक्तांना निवेदनही दिले आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Recovery from private contractors on vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.