१ जुलै रोजी वृक्षलागवडीचा विक्रम
By Admin | Updated: June 9, 2015 01:56 IST2015-06-09T01:55:56+5:302015-06-09T01:56:17+5:30
१ जुलै रोजी वृक्षलागवडीचा विक्रम

१ जुलै रोजी वृक्षलागवडीचा विक्रम
नाशिक : स्वच्छता अभियानाला नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आत्मविश्वास बळावलेल्या जिल्हा प्रशासनाने येत्या १ जुलै रोजी ५० हजार नागरिकांच्या मदतीने दोन लाख झाडे लागवड करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गुजरातचे पर्यावरणतज्ज्ञ मनीभाई मेहता यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली आहे. या तयारीचा भाग म्हणून सोमवारी वन, कृषी व महापालिका यांची संयुक्त बैठक होऊन त्यात पूर्वतयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. शहरात कोठे कोठे वृक्षलागवड करता येईल, यासाठी जागा निश्चिती करण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने शहरातील उद्यानांच्या कुंपणालगत, मोकळे मैदान, रस्त्याच्या कडेला याचबरोबर शासकीय जागेचाही पर्याय ठेवण्यात आला आहे. साधारणत: दोन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची उपलब्धता करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना कुशवाह यांनी सांगितले की, गोदावरी स्वच्छतेबाबत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची आपण भेट घेतली असून, वृक्ष लागवडीबाबतही त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. गुजरात येथील मनीभाई मेहता हे वृक्षलागवडतज्ज्ञ असून, त्यांची याकामी मदत घेण्याची सूचना सिंह यांनी केली होती, त्यानुसार मेहता यांच्याशी संपर्क साधण्यात येऊन त्यांची मदत घेण्यात येणार आहे. या हंगामात कोणते वृक्ष लावावेत व त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत ते मार्गदर्शन करतील. या वृक्षलागवड केल्यानंतर त्याच्या संगोपनाबाबतही खबरदारी घेण्यात येणार असून, साधारणत: त्या त्या संस्थेकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहितीही कुशवाह यांनी दिली.