स्थायी समितीच्या सभेत ‘उजळणी’
By Admin | Updated: July 15, 2016 00:08 IST2016-07-14T23:55:06+5:302016-07-15T00:08:50+5:30
वर्गसदस्यांमध्ये चढाओढ : आयुक्तांसमोर बुद्धिप्रदर्शन

स्थायी समितीच्या सभेत ‘उजळणी’
नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच स्थायी समितीला सामोरे गेलेले आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासमोर बुद्धिप्रदर्शनासाठी सदस्यांमध्ये चढाओढ लागली, परंतु आयुक्तांनी केवळ श्रोत्याची भूमिका घेत भाष्य न करणेच पसंत केले. स्थायीच्या सभेत वारंवार झालेल्या चर्चेनंतरही पुन्हा त्याच त्या प्रश्नांची उजळणी होऊ लागल्याने अखेर सभापतींना सदस्यांच्या उत्साहाला आवर घालावा लागला.
नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांची पहिलीच सभा असल्याने स्थायी समितीवरील काही उत्साही सदस्यांनी इतिवृत्तांतील विषयांवरही चर्चा करण्याचा आग्रह धरला. इतिवृत्त दुरुस्तीसह मंजूर केले जाईल, असे सभापती सलीम शेख यांनी स्पष्ट करूनही सदस्य आपल्या बुद्धिप्रदर्शनाला लगाम घालायला तयार होईनात. भाजपाचे दिनकर पाटील यांनी आघाडीवर येत जुन्याच विषयांवर पुन्हा चर्चा सुरू केली. फाळके स्मारकातील कामगारांच्या वेतनापासून ते घंटागाडी, खतप्रकल्प, उद्याने आदि विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. अग्निशमन दलातील डिझेल घोटाळ्यावर पुन्हा एकदा चर्चेसाठी पाटील उभे राहिले असता सभापतींनी त्यांना रोखले आणि पाटील यांना सविस्तर अहवाल देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला दिले. यावेळी अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांनी सदर अहवाल आयुक्तांच्या मान्यतेनंतर देण्यात येणार असल्याचे सांगताच पाटील यांचा पारा चढला आणि सभापतींनी अहवाल मागितला असता आयुक्तांचा संबंध येतोच कुठे, असा पवित्रा घेतला. यावेळी सभापती शेख व पाटील यांच्यात शाब्दीक चकमकही झडली.