फेरीवाल्यांसाठी भाडेदराबाबत पुनर्विचार
By Admin | Updated: July 28, 2016 01:43 IST2016-07-28T01:36:48+5:302016-07-28T01:43:03+5:30
हॉकर्स झोन : शहर फेरीवाला समितीची बैठक

फेरीवाल्यांसाठी भाडेदराबाबत पुनर्विचार
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात हॉकर्स झोनची अंमलबजावणी महापालिका महासभेचा ठराव प्राप्त होताच तातडीने सुरू करण्याची आणि फेरीवाल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाडेदराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हॉकर्स झोनच्या आराखड्याला महासभेने मंजुरी दिली असून, ठराव प्राप्त होताच सोडत पद्धतीने फेरीवाल्यांना जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाडेदराबाबतही चर्चा करण्यात आली. हॉकर्स युनियनने सदर भाडेदर कमी करण्यासंबंधी पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथे आकारण्यात येणाऱ्या भाडेदराच्या निम्मे दर नाशिकमध्ये आकारण्यात येणार आहेत, परंतु दराबाबत पुनर्विचार करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय फेरीवाल्यांचे प्रबोधन करण्यात येण्याबरोबरच काही भागातील भाजीविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी जागांचा शोध घेण्यात येणार आहे. हॉकर्स झोनची अंमलबजावणी करताना प्रथम नो हॉकर्स झोनमधील व्यावसायिकांना हटवत त्यांना नजीकच्या हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.
बैठकीत सण-उत्सव या काळातील बाजारव्यवस्था, फूडप्लाझा यावरही चर्चा झाली, तसेच नेहरू उद्यानासमोरील जागेबाबत पोलीस विभागाने घेतलेल्या हरकतींविषयी दखल घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे, विभागीय अधिकारी यांच्यासह शहर फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)