प्रारूप प्रभाग रचनेला आयोगाकडून मान्यता
By Admin | Updated: September 27, 2016 01:48 IST2016-09-27T01:48:08+5:302016-09-27T01:48:32+5:30
महानगरपालिका निवडणूक : ७ आॅक्टोबरला आरक्षण सोडत; प्रभाग रचनेचे चित्र होणार स्पष्ट

प्रारूप प्रभाग रचनेला आयोगाकडून मान्यता
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगानेही मान्यतेची मोहोर उमटविली आहे. आता येत्या ७ आॅक्टोबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार असून, त्याचवेळी प्रभाग रचनेचे चित्र बव्हंशी स्पष्ट होणार आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीमार्फत दि. १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने सदर प्रस्तावाची तपासणी करत महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदरचा प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर आयोगाकडून दि. २३ सप्टेंबरपर्यंत मान्यता दिली जाणार होती. त्यानुसार, निवडणूक आयोगाने त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे. आता दि. ७ आॅक्टोबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येऊन अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. ७ आॅक्टोबरला आरक्षित जागांसाठी सोडत काढताना प्रभागांचे नकाशे, सीमांकने दर्शविली जाणार असल्याने त्याचवेळी प्रभागाची रचना स्पष्ट होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत गोपनीयता राखण्यात आली असली तरी ती फुटल्याचा आणि त्यात भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला आहे. रचनेची माहिती बाहेर पडली असली तरी अधिकृत रचनेबाबतची उत्सुकता लोकप्रतिनिधी व इच्छुकांमध्ये कायम आहे. (प्रतिनिधी)