शाळा दुरुस्तीसाठी चार कोटी प्राप्त

By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T00:12:18+5:302014-05-30T01:04:07+5:30

पावसाने नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी

Received four crore for the school repair | शाळा दुरुस्तीसाठी चार कोटी प्राप्त

शाळा दुरुस्तीसाठी चार कोटी प्राप्त

पावसाने नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागामार्फत शाळा दुरुस्तीचे सुमारे तीन कोटींहून अधिक निधीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तीन कोटींची मागणीही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी पन्नास लाखांची तरतूद धरण्यात आली होती. त्यात वाढ करून ती तरतूद ८० लाख इतकी करण्यात आली आहे. आता जिल्हा नियोजन समितीकडूनही चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी तब्बल पावणेपाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून आपल्याच गटात सर्वाधिक दुरुस्तीची कामे करण्यात यावी यासाठी शिक्षण सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्याकडे सदस्यांनी शाळा दुरुस्तींचे प्रस्ताव पाठविण्यास सुरुवात केली आहे. मुळातच यापूर्वीच तीन कोेटींचे प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केलेले असल्याने आता नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने नुकसान झालेल्या शाळांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षण समितीच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Received four crore for the school repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.