व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाईचा बडगा
By Admin | Updated: January 1, 2015 01:15 IST2015-01-01T01:15:33+5:302015-01-01T01:15:45+5:30
एलबीटी : विवरणपत्रांची मनपाला प्रतीक्षा; आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाईचा बडगा
नाशिक : ‘व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, आम्ही वेळेत विवरणपत्रे भरू’ असा शब्द मुख्यमंत्र्यांना देत विवरणपत्रे भरण्यासाठी वाढविलेल्या मुदतीतही हजारो व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे न भरल्याने पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे.
एलबीटी जाणार, जकात येणार यांसारख्या अफवांमुळे नाशिक महापालिकेच्या एलबीटी संकलनात होत असलेली तफावत भाजपाने दिलेल्या आश्वासनानंतरही कायम राहिली. एलबीटी रद्द होईल या आशेने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटी विवरणपत्रे न भरल्याने अखेर त्यांची बॅँक खाती सील करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेने व्यापाऱ्यांची कारवाई मागे घ्यावी असे सांगितल्याने काही दिवसांपूर्वीच व्यापाऱ्यांची खाती मोकळी करण्यात आली होती.
त्यानंतरही हजारो व्यापाऱ्यांपैकी केवळ १०५० व्यापाऱ्यांनीच ३१ डिसेंबर या दिलेल्या मुदतीत विवरणपत्रे सादर केल्याने उर्वरित सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांवर नववर्षात पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी मनपा करीत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनीच ३१ डिसेंबरअखेरीस विवरणपत्रे भरू असे सांगितले होते; परंतु या शब्दाला अनेक व्यापारी जागले नसल्याने पालिकेला कारवाईचा बडगा उगारावा लागत असून, गुरुवारी त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
शहरातील सुमारे ३४ हजार व्यापाऱ्यांपैकी ६,१६२ व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी दिलेल्या मुदतीत केवळ १०५० व्यापाऱ्यांनीच विवरणपत्रे सादर केल्याने उर्वरित ४७०० व्यापाऱ्यांवर कारवाईची तयारी मनपाने सुरू केली आहे. याआधीच्या कारवाईत मनपाने ७५१ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली होती. त्यापैकी ३७५ व्यापाऱ्यांची खाती पुन्हा चालू करण्यात आली आहेत. आता नववर्षात पुन्हा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची खाती सील होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)