दहावीच्या निकालात झळकली विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:12+5:302021-07-17T04:13:12+5:30

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही, तर मग निकाल कसा लागला, असा प्रश्न ...

The real quality of the students was reflected in the results of class X. | दहावीच्या निकालात झळकली विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता

दहावीच्या निकालात झळकली विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही, तर मग निकाल कसा लागला, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला असला तरी शिक्षण विभागाने नववीचा अंतिम निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदी विविध माध्यमांचा वापर करून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणदान करण्याची कार्यपद्धती निश्चित करून दहावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामुळे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असले तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तविक गुणवत्तेच्या आधारे गुणदान झाले आहे. त्यामुळे यावर्षीच्या निकालातून दहावीच्या विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता दिसून येत असल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळातून उमटत आहे. दरम्यान,

दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजेपासून निकाल पाहता येणार असल्याची माहिती मिळाली आणि निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट वेबसाइट हॅक झाल्याने निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून आले. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकालाच्या दोन्ही लिंक पाहत असल्याने या साइट हँग झाल्या असण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने निकालासाठी यंदा result.mh-ssc.ac.in दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र, दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी, पालक निकालासाठी वारंवार या दोन्ही लिंकवर जात आहेत; पण त्या सुरू होत नसल्याने ते त्रस्त झाले होते.

कोट-१

कोरोना संकटकाळात परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या मूल्यांकन पद्धतीने गुणदान करताना दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार, असे अपेक्षित होतेच. या निकालात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण निश्चितपणे वाढले आहे; परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळालेले नाहीत. केवळ एका परीक्षेत काही विद्यार्थी त्यांची क्षमता सिद्ध करू शकत नाहीत; परंतु ते वर्षभर अभ्यास करीत असतात, हेच या निकालातून स्पष्ट होते.

-राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो.

कोट-२

कोरोनाच्या संकटकाळात शासनाने परीक्षा न घेता दहावीच्या विद्यार्थ्यांना नववी ‌व दहावीच्या एकत्रित अभ्यासाचे मूल्यांकन करून गुणदान करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता. या निर्णयामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असली तरी त्यांना मिळालेले गुण त्याच्यातील वास्तविक गुण‌वत्ता दर्शविणारे आहेत. शिवाय अशा प्रकारे निकाल जाहीर करून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर परीक्षा व निकालाचा कोणताही मानसिक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.

-गुलाब भामरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

कोट- ३

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही निकाल मिळू शकला नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे मुलांसोबतच कुटुंबातील सदस्यही नाराज झाले. मुले पास होणार असले तरी त्यांना उत्तीर्ण होण्याचा तत्काळ मिळणारा आनंद मात्र मिळू शकला नाही.

-अमोल डोंगरे, पालक

कोट- ४

शिक्षण मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर तब्बल दोन तास निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केला; परंतु निकाल उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सर्व मैत्रिणींमध्ये नाराजी पसरली. निकाल तत्काळ पाहायला मिळाला असता, तर सर्वांनी मिळून जल्लोष केला असता, आता पास होणार असल्याची खात्री असली तरी निकाल बघू शकलो नाही. त्यामुळे निराशा झाली आहे.

-आकांक्षा दराडे, विद्यार्थिनी

Web Title: The real quality of the students was reflected in the results of class X.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.