वटवाघळांची दुर्मीळ वसाहत धोक्यात
By Admin | Updated: May 7, 2017 00:15 IST2017-05-07T00:14:45+5:302017-05-07T00:15:09+5:30
नाशिक : गोदामाईच्या कुशीत वसलेली वटवाघूळ या सस्तन निशाचर प्राण्याची वसाहत धोक्यात आली आहे.

वटवाघळांची दुर्मीळ वसाहत धोक्यात
अझहर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गोदामाईच्या कुशीत वसलेली वटवाघूळ या सस्तन निशाचर प्राण्याची वसाहत धोक्यात आली आहे. गोदापार्क भागात शेकडोंच्या संख्येने वटवाघळांचा अधिवास आहे. येथील वृक्षांच्या फांद्यांना वटवाघळे दिवसा लटकलेली पहावयास मिळतात. वृक्षतोड करणाऱ्यांनी या परिसराकडे वक्रदृष्टी केल्यामुळे वटवाघळांच्या शहराजवळच्या दुर्मीळ वसाहतीवर संकट ओढावले आहे.
कुठे शुभ, तर कुठे अशुभ असा समज आणि गैरसमज अंधश्रद्धेपोटी वटवाघळाच्या बाबतीत आहे. त्यामुळे मानवाचा या प्राण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आतापर्यंत नकारात्मक राहत आला आहे. वटवाघूळ रडारप्रमाणे प्रतिध्वनिवरून वातावरणातील भक्ष्य शोधतो. या सस्तन प्राण्याचे वैशिष्ट म्हणजे पंख असूनही त्याचा पक्ष्यांमध्ये समावेश होत नाही. गोदापार्क परिसरात या प्रजातीचा अधिवास मोठ्या संख्येने आहे. महापालिकेचे दुर्लक्ष
४गोदापार्क परिसरात वृक्षतोड्यांचे दिवसेंदिवस फावत आहे. कारण त्यांना अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कुठलेही उपाययोजना केली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत असून, शहरातील वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याबरोबरच जैवविविधतेची जोपासना करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. विशेष म्हणजे पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीसह जैवविविधता समितीदेखील गठीत केली आहे.