आजच्या मोर्चासाठी सज्जता!
By Admin | Updated: September 24, 2016 02:01 IST2016-09-24T01:54:47+5:302016-09-24T02:01:51+5:30
तयारी पूर्ण : लाखोंच्या संख्येने एकवटणार मराठा समाज; विविध समाजबांधवांचा मोर्चाला पाठिंबा

आजच्या मोर्चासाठी सज्जता!
नाशिक : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून घोंघावणारे वादळ शनिवारी (दि.२४) नाशिकच्या वेशीवर येऊन धडकणार असून, सकाळी १० वाजता तपोवनातून निघणाऱ्या मूक मोर्चासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मूक मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभर विविध शहरांमध्ये निघालेल्या महामोर्चांनी घडविलेल्या शिस्त व उत्तम नियोजनाचा परिपाठ नाशिकमध्येही कायम राहावा यासाठी संयोजकांनी मोर्चात सहभागी समाजबांधवांसाठी आदर्श आचारसंहिता तयार केली असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक जिल्ह्याला लागूनच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे शनिवारी होणाऱ्या मोर्चात सुमारे १५ ते २० लाखांहून अधिक जनसमुदाय सहभागी होण्याचा अंदाज संयोजकांकडून व्यक्त केला जात आहे. मूक मोर्चा काही तासांवर येऊन ठेपल्याने संयोजकांकडून रात्री उशिरापर्यंत तयारीवर अंतिम हात फिरविला जात होता. ..या मुली देणार निवेदन गोल्फ क्लब मैदानावर मोर्चाची सांगता होणार असून, याठिकाणी मुख्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर फक्त अकरा मुलींना प्रवेश देण्यात आहे. त्यात दिव्या महाले, रसिका शिंदे, सई वाघचौरे, दिव्या साळुंके, गायत्री मगर, मयूरी पिंगळे, ऋचा पाटील, रुचिका ढिकले, चेतना अहेर, ऋतुजा दिघे आणि पल्लवी फडोळ यांचा समावेश आहे. या अकरा मुलींपैकी पाच मुली जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन निवेदन देणार असून, अन्य मुली आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. मोर्चासाठी पोलिसांची तीन तास रंगीत तालीम नाशिक : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाचा निषेध, मराठा समाजास आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि़ २४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजातर्फे क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २३) सकाळी दहा ते दुपारी १ अशी तीन तास रंगीत तालीम केली़