वाचन हेच ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे महाद्वार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:23+5:302021-06-21T04:11:23+5:30
नाशिक : हल्लीच्या युगात कोणत्याही रस्त्यावरून चालताना मद्यालये, खाद्यालये, देवालये व ग्रंथालये दिसतील. त्यापैकी कुठे जायचे व काय स्वीकारायचे ...

वाचन हेच ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे महाद्वार !
नाशिक : हल्लीच्या युगात कोणत्याही रस्त्यावरून चालताना मद्यालये, खाद्यालये, देवालये व ग्रंथालये दिसतील. त्यापैकी कुठे जायचे व काय स्वीकारायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. ज्याला जीवनात खरे ज्ञान मिळवायचे असेल त्याच्यासाठी वाचन आणि वाचनालये हेच ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे महाद्वार आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले.
क्रांतिवीर वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन दिनानिमित्त ‘वाचन संस्कृती’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून नांदेडचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रामकृष्ण बदने हे होते. मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बदने म्हणाले की, स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन करावे लागेल. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते असे म्हटले गेले आहे. तर ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘आणि ग्रंथोपजीविये’ या ओवीतून वाचनाचे महत्त्व विशद केले आहे. संत तुकारामांनीही ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची प्रयत्ने यत्न करू’ असे सांगितले. समर्थ रामदासांनी सांगितले की, ‘दिसामाजी काहीतरी वाचीत जावे’.
काय वाचावे ते ठरविणेदेखील महत्त्वाचे आहे. ज्या वाचनातून आपले मन घडेल ते वाचा. ज्याने आपले मन चळते ते वाचू नका. अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. पी. आर. गिते यांनी संदर्भ ग्रंथ, पुस्तके आणि इतर साहित्य माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातात. त्यातून मनुष्याचा विकास होत असतो, याची जाणीव ठेवली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी केले. अतिथींचा परिचय डॉ. बाळासाहेब चकोर यांनी करून दिला. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. शरद आव्हाड यांनी केले. आभार डॉ. शरद काकड यांनी मानले.
इन्फो
प्रत्येक घरात हवे ग्रंथघर
प्रत्येक घरात देवघराबरोबर ग्रंथघर ही असायला हवे. आपण प्रत्येक कार्यक्रमात अन्य वस्तू भेट देण्यापेक्षा ग्रंथ भेट देण्याचा संस्कार केला पाहिजे. वाचन म्हणजे केवळ अक्षरे डोळ्यांसमोरून घालणे नाही तर त्यानुसार आचरण करणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून संत नामदेव म्हणाले की, ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी’ हे महत्त्वाचे आहे.
फोटो
२०बदने