नाईक-मुत्रक यांच्यात पुन्हा सामना
By Admin | Updated: November 16, 2016 23:40 IST2016-11-16T23:42:47+5:302016-11-16T23:40:09+5:30
लक्षवेधी : मुत्रक पराभवाची परतफेड करतात की नाईक पुन्हा बाजी मारतात याकडे नजरा

नाईक-मुत्रक यांच्यात पुन्हा सामना
सिन्नर : नगरसेवक शैलेंद्र नाईक व माजी नगरसेवक किरण मुत्रक यांच्यात प्रभाग ८ अ मध्ये वर्चस्वासाठी पुन्हा लढत होत आहे. या प्रभागात शिवसेना, भाजपा व कॉँग्रेस यांच्यात तिरंगी लढत दिसत असला तरी खरा सामना नाईक व मुत्रक यांच्यात रंगणार असल्याची चिन्हे आहेत. कॉँग्रेसचे नवखे उमेदवार ईश्वर लोणारे या दोन तगड्या उमेदवारांचा सामना कशा पध्दतीने करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागात पंचरंगी लढत झाली होती. गेल्यावेळी झालेल्या लढतीत नाईक, मुत्रक यांच्यसह तत्कालीन नगराध्यक्ष मंगल शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर धात्रक व सुदर्शन नाईक असे पाच उमेदवार होते. या पंचरंगी लढतीत शैलेंद्र नाईक विजयी झाले होते. त्यावेळी माजी नगरसेवक मुत्रक यांच्यासह अन्य तीन उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला होता. यावेळी होऊ घातलेल्या प्रभाग ८ अ मधील ओबीसी जागेसाठी शिवसेने ेकडून विद्यमान नगरसेवक शैलेंद्र बन्सीलाल नाईक, भाजपाकडून किरण जगन्नाथ मुत्रक तर कॉँग्रेस पक्षाकडून ईश्वर दत्तात्रय लोणारे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. (वार्ताहर)